केंद्र सरकारने देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे ! – लेखक प्रा. वसंतराव भालेराव
पुणे – मंचर येथे बाबू गेनू सैद यांचे स्मारक भारत शासनाच्या वतीने व्हावे तसेच आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे-पडवळ येथील सैद वाडीतील बाबू गेनू यांच्या जन्मस्थळाला पंतप्रधानांनी भेट देऊन श्रद्धासुमन अर्पण करावे, या मागण्यांचे निवेदन ‘ई-मेल’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सांडला कलश रक्ताचा’ या पुस्तकाचे लेखक प्रा. वसंतराव भालेराव यांनी पाठवले आहे. ‘मुंबईत काळबादेवी रस्त्यावर १२ डिसेंबर १९३० या दिवशी स्वदेशी वस्तूंचा वापर आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार आंदोलन चालू होते. डोळ्यांसमोर मृत्यू दिसत असतांनाही विदेशी कपड्यांनी भरलेल्या ट्रक समोर छातीचा कोट करून उभे राहून २२ वर्षांच्या देशभक्त बाबू गेनू या तरुणाने बलीदान दिले. त्यानंतरच स्वातंत्रलढ्याचा अग्नीकुंड पेटला. पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचे अभियान देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी चालू केले आहे. त्यांनी बाबू गेनू यांच्या जन्मस्थळाला भेट दिल्यास संपूर्ण देशात ‘आत्मनिर्भर भारतासाठी’ एक सकारात्मक संदेश जाईल. आपला देश आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येक भारतियाच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण होईल’, असेही भालेराव यांनी निवेदनात नमूद केले आहे.