सातारा जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
सातारा, २ जून (वार्ता.) – जिल्ह्यात कडक दळणवळण बंदी असल्याने कोरोना बाधितांचा दर अल्प झाला आहे. बाधित दर अजून अल्प करण्यासाठी विविध उपाययोजना राबवून कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाविषयक उपाययोजनांचा आढावा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, ‘‘लसीकरणासाठी नागरिकांना टोकन दिल्यानंतर केवळ सकाळी ९ ते ११ या वेळेतच लसीकरण करावे. तसेच जो बाधित झाला आहे, त्याच्या संपर्कात जे जे आले आहेत त्यांचा शोध घेण्यात यावा. तिसर्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने आतापासूनच सिद्धता करावी. त्यासाठी स्वतंत्र इमारती आतापासूनच कह्यात घ्याव्यात.’’