कार्वे आरोग्य केंद्रासमोरच ‘कचरा डेपो’ !
कराड, २ जून (वार्ता.) – वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्वे येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत गत २० वर्षांपासून बंद स्थितीमध्ये आहे. उपकेंद्र कार्यान्वित ठेवण्यात ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग पूर्णत: अपयशी ठरल्यामुळे याठिकाणी कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. कोरोनाच्या संकटकाळात या इमारतीमधून नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्याऐवजी तेथील कचरा आणि दुर्गंधी यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग पुढाकार घेतांना दिसत नाही.
कार्वेतील आरोग्य उपकेंद्राची ४ गुंठ्यामध्ये पसरलेली ही इमारत बंद स्थितीमध्ये पडून आहे. चावडीतील एका छोट्या खोलीत उपकेंद्राचे सध्याचे कामकाज चालू आहे. आरोग्यासाठी स्वतंत्र इमारत असूनही नागरिकांना उपचारासाठी चावडीच्या खोलीत किंवा वडगाव हवेलीला हेलपाटे मारावे लागत आहेत. निदान कोरोना काळात तरी आरोग्य उपकेंद्र चालू होईल, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.