राजगुरुनगर (जिल्हा पुणे) मध्ये १४४ कलम लागू !
राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर १४ पंचायत समिती सदस्यांपैकी ११ जणांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने राजकीय घडामोडींना हिंसक वळण लागले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राजगुरुनगरमध्ये ३१ मे या दिवशी १४४ कलम लागू केले असून तेथे स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दल आणि दंगा काबू पथक यांचा बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली. अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर ११ सदस्यांना डोणजे याठिकाणी ठेवले होते; मात्र सभापती आणि त्यांच्या समर्थकांनी तेथे गोंधळ घातल्याने सभापतींना अटक झाली. अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या सभागृहात मतदान होणार असून इमारतीच्या आसपास अर्धा किलोमीटरपर्यंत कोणीही येण्यास अटकाव केला आहे.