श्री. सोहम् यांची कु. हर्षाली कदवाने यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. आदरभाव
‘सोहमदादामध्ये इतरांविषयी पुष्कळ आदरभाव आहे. दादा सर्वांशी आदराने बोलतात.
२. इतरांचा विचार करणे
एके दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यज्ञ पूर्ण झाल्यावर आवरत असतांना मी त्यांच्या साहाय्याला गेले. त्यांना जेवण वाढून झाल्यावर मी राहिलेले आवरणार होते. तेव्हा १० वाजले होते. त्यांना मी जेवण वाढत असतांना सोहमदादा त्याचे जेवण वाढून घेत होता. त्या वेळी दादाने मला विचारले, ‘‘ताई, तुमचे जेवण झाले का ?’’ मी म्हणाले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे आवरून झाल्यावर मी जेवायला जाईन.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘ताई, तुम्ही जेवून घ्या. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी मला सांगितले आहे की, बाकीचे नंतर आवरू. त्यामुळे तुम्हीही आधी जेवून घ्या.’’ असे प्रत्येक गोष्टीत दादा इतरांचा पुष्कळ विचार करतात.
३. दादांची निरीक्षणक्षमता आणि सतर्कता चांगली आहे.
४. कर्तेपणा स्वतःकडे न घेता सतत शिकण्याच्या स्थितीत असणे
एके दिवशी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या खोलीत भ्रमणसंगणकावर एका सत्संगाची जोडणी करायची होती. त्याच वेळी मला अन्य सेवाही करायच्या होत्या. तेव्हा सोहमदादा मला म्हणाले, ‘‘मी जोडणी करतो. मलाही जोडणी शिकायची आहे. तुम्ही तुमच्या दुसर्या सेवा करा.’’ प्रत्यक्षात दादांना त्यातील सर्व ठाऊक आहे आणि त्यांना जोडणीही करता येते; पण ते स्वतःकडे कर्तेपणा घेत नाहीत. ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात.
५. शारीरिक त्रास आणि रात्री उशिरा झोप लागत असतांनाही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना सेवेमध्ये साहाय्य करणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई रात्री सेवा करत असतात. एके दिवशी त्यांनी मला सांगितले, ‘‘सोहमनेही मला साहाय्य केले. त्यामुळे माझे सर्व लवकर झाले.’’ सोहमदादाला शारीरिक त्रास होत असतो आणि रात्री झोपही उशिरा लागते, तरीही ते त्यांच्या वेळेचा सदुपयोग करत असतात. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना सेवेमध्ये साहाय्य करत असतात.
६. सेवा व्यवस्थित आणि परिपूर्ण करणे
सोहमदादांमध्ये परिपूर्णता आणि व्यवस्थितपणा पुष्कळ आहे. हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. एकदा सोहमदादा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे ‘लेबल्स’ बनवत असतांना त्यांनी ते एकदम व्यवस्थित कापले आणि चांगल्या अक्षरांत लिहिले. ‘लेबल’कडे पाहून मनाला प्रसन्न वाटत होते आणि त्यातून चांगली स्पंदनेही येत होती.
७. समष्टीत सर्वांशी मिसळणे आणि मनमोकळेपणाने बोलणे
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सोहमला तो अबोल असल्यामुळे समष्टीत सर्वांशी मनमोकळेपणाने बोलायला सांगितले होते. ‘दादा त्यावर प्रयत्न करत आहे. तो आता सर्वांची विचारपूस करतो आणि समष्टीमधे मिसळण्याचा प्रयत्न करतो’, असे माझ्या लक्षात आले.
मुळातच सोहमदादांमध्ये अनेक गुण असून त्यांच्यामध्ये पू. नीलेशदादा आणि देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईं यांचे प्रतिबिंब जाणवते.
‘प.पू. गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सोहमदादांकडून पुष्कळ शिकायला मिळाले, त्यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. हर्षाली कदवाने (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.४.२०२१)