मरणप्राय वेदना देेेणार्या आजारपणात नामजपादी उपाय आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा यांमुळे प्रकृती पूर्ववत् झाल्याची अनुभूती घेणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे फोंडा येथील श्री. दामोदर वझे !
१. शरीर दगडासारखे घट्ट होऊन मरणप्राय वेदना होणे आणि प्राणशक्ती अल्प होणे
‘भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशीला, म्हणजे १५.९.२०२० या दिवसापासून मी रुग्णाईत झालो. त्यापूर्वी ४ दिवसांपासूनच मला बरे वाटत नव्हते. त्या वेळी मला सर्दी किंवा ताप नव्हता; पण माझे अंग दुखायचे. संपूर्ण शरिराला मरणप्राय वेदना होत होत्या. मला काहीच सुचत नव्हते. कंबरेपासून कंठापर्यंत सर्व शरीर दगडासारखे घट्ट झाले होते. माझ्या पोटात पुष्कळ दुखायचे. मला बोलताही येत नव्हते. माझी प्राणशक्ती अल्प झाली होती.
२. परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण होऊन भावजागृती होणे
त्या वेळी अकस्मात् परात्पर गुरु डॉक्टरांच्या आठवणीने माझा कंठ दाटून आला. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी पत्नी आणि मुले यांना म्हणालो, ‘‘जेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती पुष्कळ अल्प होते, त्या वेळी त्यांना शारीरिक वेदना होत असतांनाही ते साधकांसाठी प्रयत्नरत असतात. गुरुमाऊली सर्व साधकांना होणारे त्रास स्वतःवर घेतात आणि साधकांना आध्यात्मिक प्रगतीसाठी बळ देतात.’’
३. औषधोपचार केल्याने प्रकृतीत थोडी सुधारणा होणे; पण अशक्तपणा अधिक असल्याने झोपून रहावे लागणे
आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांनी मला औषध दिले. त्यासमवेत मी वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार काढा घेणे इत्यादी चालू केले. त्यामुळे प्रकृतीत थोडा पालट झाला; पण मला अशक्तपणा एवढा आला होता की, केवळ झोपून रहावे लागत होते. मला बसायलाही होत नव्हते.
४. नामजपादी उपायांमुळे झालेला लाभ
४ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप केल्यावर चांगला परिणाम जाणवणेे : १७.९.२०२० या दिवशी सहसाधक श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. अमर जोशी यांनी मला दूरभाष केला. त्या वेळी माझ्या आवाजावरून त्यांनी मी रुग्णाईत असल्याचे ओळखले. श्री. सिद्धेशने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना माझ्या आजारपणाविषयी सांगितले. तेव्हा सद्गुरु काकांनी मला ‘निर्गुण’ हा नामजप करायला सांगितला. नामजप केल्याने मला चांगला परिणाम जाणवला.
४ आ. दृष्ट काढल्यावर त्रास उणावणे : नामजप केल्यानंतरही माझे शरीर कंबरेपासून कंठापर्यंत कडक झाले होते. दोन दिवसांनी मी सद्गुरु गाडगीळकाकांना माझी शारीरिक स्थिती सांगितली. त्यांनी मला ३ दिवस संध्याकाळी ७ वाजता तुरटीने दृष्ट काढायला सांगितली. प्रत्येक दिवशी दृष्ट काढल्यानंतर माझा त्रास उणावत गेला आणि नंतर मला उठून बसता येणे शक्य झाले.
४ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेल्या उपायामुळे झालेला लाभ ! : श्री. अमरने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना माझ्या आजारपणाविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मंडल इत्यादी घालून उपाय करण्यास सांगितले. त्यानंतर शरिराचा घट्टपणा न्यून होऊन माझ्या पोटात दुखायचे थांबले; पण अशक्तपणा राहिला होता.
५. एका ज्योतिषी-पुरोहितांनी अंगदुखीसाठी अनुष्ठानाचे उपाय करण्यास सांगितलेले असणे आणि संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर ज्योतिषांनी ‘आता कोणताही विधी करण्याची आवश्यकता नाही’, असे सांगणे
वरील नामजपादी उपाय करण्यापूर्वी आमच्या ओळखीचे एक ज्योतिषी-पुरोहित माझ्या अंगदुखीवर अनुष्ठानाचे उपाय सांगणार होते; त्यांनी ‘तंत्रशास्त्रानुसार तुमच्यावर कुणीतरी फार मोठी करणी केली आहे’, असे सांगून त्यासाठी मला उपाय सांगितले, तसेच ‘प्राथमिक आजारातून बरे झाल्यावर ‘कोणते अनुष्ठान करायचे, ते सांगतो’, असेही सांगितले होते. प्रकृती ठीक होऊ लागल्यावर मी त्या ज्योतिषांना दूरभाष करून ‘‘मी कोणते दैवी अनुष्ठान करायचे ?’’, असे विचारले. तेव्हा त्यांनी त्यांच्या देवाला प्रश्न विचारला. तेव्हा त्यांना उत्तर मिळाले, ‘त्यांच्यावर (श्री. वझे यांच्यावर) उपाय झालेले आहेत. आता कोणताही विधी करण्याची आवश्यकता नाही.’
त्या वेळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा जाणवली आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. कोणतेही विधी न करता संतांच्या संकल्पाने केवळ दृष्ट काढून मी आजारपणातून बरे झालो. यावरून संकल्पाचे सामर्थ्य लक्षात येते.
कृतज्ञता
परात्पर गुरु डॉक्टरांंच्या कृपेने, तसेच सद्गुरु गाडगीळकाका आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेेल्या उपायांनी मी मोठ्या संकटातून बरा होऊन पूर्ववत् झालो. यासाठी श्री गुरूंच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.
परात्पर गुरु डॉक्टर माझ्या प्रकृतीची विचारपूस करायचे. त्यांची प्रीती अपार आहे. नातेवाईक केवळ एकदाच आपल्याला औपचारिक भेट देऊन जातात; पण गुरुमाऊली मात्र आपल्यावर अखंड लक्ष ठेवत असते. गुरुमाऊलींनी केलेल्या चौकशीमुळे गोळ्या, इंजेक्शन्स इत्यादी (स्थुलातील) सर्व उपचार आपोआप होतात. केवळ आपली श्रद्धा, भाव आणि भक्ती असली पाहिजे.
वरील सूत्रे लिहितांना मला ‘मी परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु गाडगीळकाका आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना प्रत्यक्ष भेटून हे सर्व सांगत आहे’, असे वाटले. पुन्हा एकदा गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. दामोदर विष्णु वझे, संचालक, सनातन पुरोहित पाठशाळा, फोंडा, गोवा. (२९.३.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |