स्पर्धकांचे कौतुक न केल्यास कार्यक्रमातून काढून टाकण्याची निर्मात्यांकडून धमकी !

‘इंडियन आयडॉल’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’विषयी गायिका सुनिधी चौहान यांचा धक्कादायक आरोप

सुनिधी चौहान

मुंबई – ‘इंडियन आयडॉल’च्या कार्यक्रमामध्ये मला कॅमेर्‍यापुढे येण्यापूर्वी स्पर्धकांचे कौतुक करायला सांगण्यात आले. मला ते पटले नव्हते; पण त्याहून धक्कादायक म्हणजे ‘मी तसे केले नाही, तर मला कार्यक्रमातून काढून टाकण्यात येईल’, अशी धमकी देण्यात आली, असा गंभीर आरोप गायिका सुनिधी चौहान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

नवोदित गायकांना त्यांची कला दाखवण्यासाठी ‘इंडियन आयडॉल’ हा ‘रिअ‍ॅलिटी शो’ प्रसारित केला जातो. यात गायिका सुनिधी चौहान परीक्षक होत्या.

त्या म्हणाल्या, ‘‘लोकांचे लक्ष स्वत:कडे आकर्षित करून घेण्यासाठी आणि ‘टीआरपी ’साठी असे केले जाते. मी कधीही नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांना स्पर्धकांची चूक दाखवतांना पाहिले नाही. असे केल्याने स्पर्धकांची हानी होत आहे. त्यांचे भविष्य अंधारात जात आहे.’’

काही दिवसांपूर्वी गायक अमित कुमार यांनीही कार्यक्रमामध्ये निर्मात्यांनी त्यांना स्पर्धकांचे खोटे कौतुक करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत यांनीही स्पर्धकांच्या गायकीऐवजी घरची गरिबी दाखवण्यात येत असल्याची टीका केली होती.