आपले सत्ताधारी सतर्क नसल्यामुळे वर्ष २०२० पेक्षा वर्ष २०२१ भयंकर ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
मुंबई – जगावर आलेल्या या संकटाची कुणालाच कल्पना नव्हती. केवळ आपल्याकडून नव्हे, तर अमेरिका आणि युरोपिय देश यांच्याकडूनही चुका झाल्या; मात्र ते लवकर वठणीवर आले, आपण अद्यापही आलो नाही. ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’, हे आपल्याकडे झाले नाही. आपले सत्ताधारी सतर्क राहिले नाहीत. त्यामुळे वर्ष २०२० पेक्षा वर्ष २०२१ भयंकर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा संताप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. दैनिक ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी वरील भावना व्यक्त केल्या.
या वेळी राज ठाकरे म्हणाले, ‘‘भारतात जाऊ नका, असे चित्र जगात निर्माण झाले आहे. ज्यांना देशातून काढता येत नाही, तो बांगलादेश भारतासाठी सीमा बंद केल्याचे सांगत आहे. यांच्याकडून निघणारी माणसे आम्ही पोसायची आणि यांनी मात्र आपणाला सीमा बंद असल्याचे सांगायचे. त्यांनी सीमा उघडली, तरी जाणार कोण ? हा प्रश्नच आहे; पण अशा प्रकारे आपल्या देशाची नाचक्की व्हावी, यासारखे दुर्दैव नाही. आपण अन्यांकडून धडा घेतला नाही. आम्ही निवडणुका, कुंभमेळे, राजकारण यांत गुंतलो आहोत. केंद्र किंवा राज्य शासन असेल, तुमचे घोडं राजकीय पक्षांनी मारले असेल, समाजाने नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत ‘हे राज्य आपले नाही, ते आपले आहे’, असे करून चालणार नाही.’’
सौजन्य : लोकसत्ता यू ट्यूब