मुंबईतील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांच्या चाचणीचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन !
विरोधात आंदोलन करणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले कह्यात
मुंबई – मुंबईतील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांच्या चाचणीचे ३१ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवली येथील आकुर्ली रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. याच वेळी मेट्रोच्या कामाला विलंब होत असल्याविषयी भाजपकडून मात्र या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार अतुल भातखळकर यांसह अन्य भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. ‘मेट्रोच्या कामाला होत असलेल्या विलंबाला उत्तरदायी कोण ?’, असा प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे.
या प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी १२ सहस्र कोटी रुपये इतका व्यय होणार आहे. या मार्गांवरून धावणारी ‘मेट्रो’ पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे, तसेच या ‘मेट्रो’मध्ये चालक नसेल. मुंबईच्या चारकोप डेपोमध्ये या ‘मेट्रो’ची कारशेड आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चे आयुक्त आर्.ए. राजीव या कामाविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘वर्ष २०१४ मध्ये पहिली ‘मेट्रो’ चालू झाली होती. त्यानंतर लगेच आपण ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांकडे वाटचाल करत आहोत. याचा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण होईल. या दोन्ही मार्गांवरून नियमित १२ लाख प्रवासी प्रवास करू शकतील. यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २५ टक्क्यांनी न्यून होईल.’’