म्हसवड (जिल्हा सातारा) येथे ‘हत्ती’ गवतापासून गॅसनिर्मिती !
सातारा, १ जून (वार्ता.) – दुष्काळी भाग समजल्या जाणार्या म्हसवड परिसरातील मासाळवाडी येथे ‘हत्ती’ गवतापासून गॅसनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातून प्रतिदिन १०० टन गॅसची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी बांधवांना ठोस उत्पन्न मिळणार असून अनेक युवकांच्या हाताला काम मिळणार आहे.
मुंबई येथील ‘प्रभुरत्न बायोफ्युल्स’ आस्थापनाकडून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. आस्थापनाचे अध्यक्ष दीपक कोळपे यांच्याहस्ते नुकतेच प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. गॅस निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून शेतकर्यांकडून प्रतिटन १ सहस्र रुपये ‘हत्ती’ गॅस घेतला जाणार आहे. सध्या पेट्रोल, डिझेल अन् घरगुती उपयोगाच्या गॅसच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशातच आता सामान्यांना परवडेल असे जैवइंधन येथे निर्माण होणार आहे. सध्या उपयोगात असणार्या सी.एन्.जी. गॅसमधूनही अल्पसे प्रदूषण होते; मात्र गवतामधून निर्माण होणार्या गॅसपासून अल्पसेही प्रदूषण होणार नाही. आस्थापनाच्या वतीने ‘हत्ती’ गवताचे नवीन वाण ‘सुपर नेपियर’ हे शेतकर्यांना पुरवण्यात येणार आहे. या पिकासाठी कोणतीही भूमी चालते. तसेच एकरी ४० टन ऐवढे उत्पन्न अनुमाने अडीच मासात घेता येते. एका वर्षांत ४ वेळा उत्पन्न घेतले, तरी १ लाख ५० सहस्र निश्चित उत्पन्न शेतकर्याला मिळू शकते.
प्रदूषण आणि कर्करोग मुक्त शेतीकडे नेणारा पथदर्शी प्रकल्प ! – दीपक कोळपे, अध्यक्ष प्रभुरत्न बायोफ्युल्स इंडिया प्रा.लि.भारताला ८२ प्रतिशत इंधन आयात करावे लागते. त्यामुळे भारतातील बराचसा पैसा इंधनासाठी बाहेरील देशांना जातो. त्याला पर्याय म्हणून आत्मनिर्भर भारतासाठी हा एक आदर्श ठरू शकतो. हा प्रकल्प शेतकरी बांधवांना प्रदूषण आणि कर्करोग मुक्त शेतीकडे नेणारा पथदर्शी प्रकल्प आहे. |