भावप्रयोगात श्री गुरूंच्या चरणांवर मन अर्पण केल्यावर ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांना आलेली अनुभूती
१. भावप्रयोगाच्या आरंभी मनात भूतकाळातील विचार असल्याने गुरुदेवांना ‘आता या मायाबाजारातून मला सोडवा’, अशी प्रार्थना होणे
‘प्रतिदिन होणार्या सेवेच्या आढाव्यात आम्ही एकेका साधकाला ५ ते १० मिनिटांचा एक भावप्रयोग घ्यायला सांगतो. एप्रिल २०२१ मध्ये कु. ऐश्वर्या रायकर ही साधिका एकदा भावप्रयोग सांगत होती. त्या वेळी आरंभी माझ्या मनात भूतकाळातील विचार होते. त्यामुळे माझे लक्ष तिच्या शब्दांकडे न जाता ‘गुरुदेवा, आता या मायाबाजारातून तुम्हीच मला सोडवा’, अशी माझी गुरुदेवांना प्रार्थना होत होती.
२. भावप्रयोगात सांगितल्याप्रमाणे श्री गुरूंच्या चरणी मन अर्पण केल्यावर अनाहतचक्रातून तेजोवलय बाहेर पडून मिटलेल्या डोळ्यांसमोर पुष्कळ प्रकाश दिसणे आणि ‘समष्टीसाठी कार्य करण्यासाठी तुला ही अनुभूती दिली’, असे गुरुमाऊली सांगत असल्याचे जाणवणे
त्याच वेळी ऐश्वर्या भावप्रयोगात सांगत असलेले शब्द माझ्या कानावर पडले, ‘‘आता आपण शरणागतभावाने आपले मन श्री गुरूंच्या चरणी ठेवूया.’’ त्या वेळी मी संपूर्ण शरणागतीने श्री गुरूंच्या चरणांवर माझे मन अर्पण केले आणि मला अकस्मात् जाणवले, ‘माझ्या अनाहतचक्रातून तेजोवलय बाहेर पडत आहे. ते वलय एवढे मोठे होत गेले की, मला माझ्या मिटलेल्या डोळ्यांसमोर पुष्कळ प्रकाश दिसत होता.’ मी १ – २ मिनिटे निर्विचार होऊन ही स्थिती अनुभवत होते. त्या वेळी मला आतून जाणवले, ‘गुरुमाऊली म्हणत आहे की, तू एकटी प्रयत्न न करता आता समष्टीसाठी कार्य करण्यासाठी तुला ही अनुभूती दिली आहे.’
मला ही अनुभूती केवळ गुरुदेवांच्याच कृपेने आली. ‘त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या देहाच्या माध्यमातून साधना करून घ्यावी’, हीच त्यांच्या सुकोमल चरणी प्रार्थना !’
– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२१)
|