धर्मशिक्षणानेच ‘आत्महत्या’ रोखू शकतो !
पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात एकाच दिवशी आत्महत्येच्या ३ घटना समोर आल्या. या आत्महत्यांचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र मागील काही मासांपासून आणि गेल्या वर्षी लागू झालेल्या दळणवळण बंदीपासून आत्महत्यांच्या घटनांमध्ये पुष्कळ वाढ झालेली दिसून येत आहे. वर्ष २०१९ च्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार १ लाख ३९ सहस्र १२३ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. या अहवालानुसार भारतभरामध्ये प्रतिदिन ३८१ जण आत्महत्या करत आहेत. खरेतर ही आकडेवारी चिंताजनक आहे. एकट्या महाराष्ट्रात १८ सहस्र ९१६ जणांनी त्या वर्षी आत्महत्या केली.
विज्ञानाने पुष्कळ प्रगती केली आहे; मात्र ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्थिर कसे रहायचे किंवा कमकुवत मनाला कणखर कसे करायचे ?’, याविषयी त्याच्याकडे ठोस उत्तर नाही. मनाच्या भीतीयुक्त स्थितीतून बाहेर पडण्यासाठी विज्ञान साहाय्य करू शकत नाही, हे विज्ञानाचे अपयशच नव्हे का ? खरेतर मनुष्य जन्म मिळणे, हे अत्यंत दुर्मिळ असते. प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि आध्यात्मिक प्रगती करणे यांसाठी मनुष्य जन्म प्राप्त होतो. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘अमूल्य मनुष्य जन्म का मिळाला आहे ?’, हे लक्षात येत नाही. तसेच मनाच्या कमकुवतपणावर मात करता न आल्याने व्यक्ती आत्महत्या करते; परंतु यामुळे किती प्रमाणात पाप लागते, याची त्याला जाणीव नसते. धर्मशास्त्र समजून घेतल्यास आत्महत्येमुळे लागणारे पाप आणि त्यामुळे होणारी अपरिमित हानी आपण टाळू शकतो.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे यांना आयुष्यभर समाजाकडून पुष्कळ अपमानित करण्यात आले; मात्र त्यांनी ध्येयाचा विसर पडू न देता त्यांचे कार्य पूर्ण केले. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी त्यांच्या शिष्यांना धर्मशिक्षण देत असल्याने आत्महत्या होत नसत; मात्र सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये धर्मशिक्षण दिले जात नसल्याने शिक्षणाची दिशाच भरकटत चालली आहे. त्यामुळे भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सध्याच्या शिक्षणपद्धतीत ‘धर्मशिक्षण’ अंतर्भूत केल्यास जीवनमूल्यांचे वेगळे शिक्षण देण्याची आवश्यकता रहाणार नाही.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर