जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी होण्यासाठी १५ दिवस कडक निर्बंधांची कार्यवाही करावी ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

कोल्हापूर, १ जून – जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवस कडक निर्बंधांची कार्यवाही करण्यात येणार आहे. यात जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यांवर कडक पडताळणी करण्यात येणार असून ज्यांचा कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ आहे अशांनाच, तसेच अत्यावश्यक कारण असणार्‍या नागरिकांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. १ जून या दिवशी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘घरातील एका बाधित व्यक्तीकडून कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत असल्याचे आढळून येत आहे. त्यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक अगलीकरण करण्यावर भर द्या. नेमून दिलेल्या वेळेच्या व्यक्तीरिक्त दुकाने चालू राहिल्यास अशी दुकाने बंद करून दंडात्मक कारवाई करावी. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी गावनिहाय आणि प्रभागनिहाय सूक्ष्म नियोजन करून प्रभावी कार्यवाही करावी.’’