पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रहित

शिवाजीराव भोसले सहकारी बँक

पुणे – आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रहित केला आहे. सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई केल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. बँकेच्या ९८ टक्के ठेवीदारांना ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण असल्याने विमा महामंडळाकडून त्यांच्या ठेवी परत मिळू शकणार आहेत.

भोसले बँकेकडे पुरेसे भांडवल नाही, उत्पन्नाचे स्रोत नाहीत. कायद्यानुसार बँक विविध निकषांची पूर्तता करू शकत नाही. बँक त्यांच्या ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय चालू ठेवण्याची अनुमती देता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँक अवसायनात काढण्याची प्रक्रिया तातडीने चालू करण्यात आली आहे.