सातारा जिल्ह्यात पुन्हा ८ जूनपर्यंत कडक दळणवळण बंदी
सातारा, १ जून (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढ चालूच असल्यामुळे १५ जूनपर्यंत दळणवळण बंदी राहील; मात्र ८ जूनपर्यंत कडक दळणवळण बंदी असणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये रुग्णालये, औषधालये, कृषी सेवा, उद्योग, पेट्रोल पंप आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, शाळा, महविद्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे बंदच रहाणार आहेत, असे ३१ मेच्या सायंकाळी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रे सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत चालू रहातील. शेतीविषयक सेवांची दुकाने सकाळी ९ दुपारी ३ या वेळेत चालू रहातील. शिवभोजन योजनेमध्ये केवळ पार्सल सेवा चालू राहिल. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असून अधिकाधिक २५ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये लग्नसमारंभ करण्यास अनुमती असेल. सभागृह किंवा मंगल कार्यालयात एकच लग्नसमारंभ २ घंट्यांमध्ये आटोपता घ्यावा लागेल. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी २४ घंटे पेट्रोल पंप चालू ठेवण्यात येतील. तसेच रास्त भाव धान्य दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू ठेवण्यात येतील. कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी ६ ते ११ चालू ठेवण्यात येणार असून त्यामध्ये सामाजिक अंतर राखण्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकोष सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चालू ठेवण्यात येणार आहेत.