पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय नसल्याने वारंवार रस्त्यांची खोदाई !
महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या करातून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा होत असलेला अपव्यय भरून देण्याचे दायित्व कोण घेणार ?
पुणे, १ जून – येथील महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये समन्वय नसल्याने शहरातील महत्त्वाचे सर्व सिमेंटचे रस्ते फोडण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या ३ वर्षांत महापालिकेने सिमेंटचे रस्ते करण्यासाठी अनुमाने ४०० कोटींचा व्यय केला आहे. कामांसाठी हव्या त्या पद्धतीने सिमेंटचे रस्ते फोडले जात असल्याने नागरिकांच्या करातून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय होत असून सिमेंटच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आता पुन्हा लाखो रुपयांची उधळपट्टी करावी लागणार आहे.
काही ठिकाणी सुस्थितीत असणारे रस्ते खोदून ते नव्याने सिमेंटचे करण्यात येत आहेत. शहरातील एकूण ५०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी जवळपास २०० कि.मी.हून अधिक लांबीचे रस्ते फोडण्यात आले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या रस्त्यांवरील पाणी भूमीत मुरत नाही. त्यामुळे भूजल पातळी खालावत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावरही महापालिकेकडून उपाय शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सिमेंटच्या रस्त्यांवर खड्डे पडू नयेत, यासाठी सर्व भूमीगत वाहिन्या रस्त्याच्या कडेला घेण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येतो; मात्र शहरातील चित्र पाहिले, तर बहुतांश ठिकाणी सिमेंटचे रस्ते मधोमध फोडल्याचे दिसून येते.
पथ विभागाचे अधीक्षक अभियंता विजय शिंदे यांनी सांगितले की, पाणीपुरवठा आणि मल:निस्सारण विभागाची कामे सध्या चालू आहेत. त्यामुळे रस्त्यांची खोदाई होत आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.