केवळ ९० दिवस !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘कोरोनाची उत्पत्ती कुठून झाली ?’ याचा शोध पुढील ९० दिवसांत घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश त्यांच्या गुप्तचर विभागाला दिला आहे. त्यामुळे आता अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा कामाला लागली आहे. ‘कोरोनाविषयीची खरी माहिती या अन्वेषणातून समोर येईल’, अशी आशा आपण व्यक्त करू शकतो. अमेरिकेचे मागील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची उत्पत्ती चीनमधून झाल्याचा दावा केला होता. त्यांनी याला ‘चिनी विषाणू’ अशा नावाने संबोधले होते. त्याला अमेरिकेतीलच काही पत्रकारांनी आक्षेप घेतला होता. त्यावर ट्रम्प यांनी या विषाणूची उत्पत्ती चीनमधून झाल्याचे ठासून सांगत असल्याचे अनेकांनी दूरचित्रवाणीवर पाहिले असेलच. ट्रम्प यांनी अनेक प्रयत्न करूनही कोरोनाची उत्पत्ती चीनने केल्याचा पुरावा ते गोळा करू शकले नाहीत. आता बायडेन यांच्या काळात पुन्हा याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ट्रम्प पुरावा गोळा करू शकले नव्हते, यामागे जागतिक आरोग्य संघटना हेही एक कारण मानले जाते. सध्या या संघटनेत चीनचा दबदबा असल्यामुळे जेव्हापासून कोरोना विषाणू समोर आला, तेव्हापासून या संघटनेकडून ‘कोरोनाच्या उत्पत्तीमागे चीन कसा नाही ?’, हेच सांगण्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न केला जात आहे. या संघटनेच्या अशा भूमिकेमुळेच ट्रम्प यांनी अमेरिकेकडून तिला देण्यात येणारा निधी बंद केला होता. बायडेन सरकारने आता पुन्हा तो देण्याचे घोषित केले आहे. ‘कोरोनाची उत्पत्ती कुठून झाली ?’ याची चौकशी करण्याची अनेक देशांची मागणी चीनच्या दबावामुळे जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळून लावली होती. चीननेही त्याच्या देशात येऊन या संदर्भात कोणत्याही प्रकारचे अन्वेषण करण्यास नकार दिला होता. साधारण एका वर्षानंतर चीनने अन्वेषण करण्यास अनुमती दिल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक चीनच्या वुहान शहरातील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत गेले होते. ‘याच प्रयोगशाळेतून कोरोनाचे विषाणू वातावरणात पसरले’, असा दावा केला जात आहे. मुळात ‘एका वर्षानंतर अशा ठिकाणी जाऊन कधीतरी पुरावा सापडणार आहे का ?’ असा प्रश्न कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या मनात येणारच. त्यातही ज्याच्यावर आरोप आहे, तो चीन असे सहजासहजी पुरावा ठेवील का ? त्यामुळे साहजिकच या पथकाने केलेल्या अन्वेषणातून या प्रयोगशाळेतून कोरोना पसरल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही; मात्र त्याच वेळी या शहरातील या प्रयोगशाळेपासून काही अंतरावर असणार्या मांस बाजारात कोरोनाचे विषाणू सापडले आणि तेथून त्याचा संसर्ग झाल्याचे या पथकाने सांगितले. कोरोनाचे विषाणू वटवाघळांमध्ये सापडतात. या मांस बाजारात वटवाघूळही विक्रीसाठी असल्याने हे विषाणू मनुष्यनिर्मित नसून ते प्राण्यांमुळे मनुष्यात संसर्गित झाले आणि त्यातून त्याचा संसर्ग सर्वत्र झाला, असे सांगण्यात आले. शास्त्रीयदृष्ट्या यात चुकीचे काहीच नाही. येथेच खरी गोम आहे, असे तज्ञांकडून सांगितले जात आहे. एखाद्याच्या ‘खांद्या’वर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रकार आपल्याला ठाऊक आहे. येथे चीनने वटवाघळांना माध्यम करून निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे, हेच यातून स्पष्ट होते. काही दिवसांपूर्वी एका विदेशी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्ताद्वारे ‘चीनने ६ वर्षांपूर्वीच तिसरे महायुद्ध जैविक शस्त्रांद्वारे लढण्याच्या दृष्टीने जैविक अस्त्रे बनवण्याचा प्रारंभ केला होता’, असा चीनच्या काही तज्ञांचा एक गोपनीय अहवाल समोर आणला होता. ‘कोरोना हे त्याच प्रकारातील जैविक अस्त्र आहे’, असे आता म्हटले जाऊ लागले आहे. ‘वटवाघळांमध्ये सापडणारे कोरोनाचे विषाणू चीनने हवेत पसरवून ते माणसांना कसे संसर्गित करू शकतात ?’, याविषयीचे संशोधन चालू केले होते. त्यातही ‘ते जर माणसांमध्ये संसर्गित झाले, तर त्यापासून बचाव आणि उपाय कसा काढता येईल ?’, याचेही समांतर संशोधन चालू होते. जेव्हा चीनने कोरोना एक अस्त्र म्हणून बनवण्याचे साध्य केले, त्याच वेळी कदाचित् ते प्रयोगशाळेतून लिक झाले आणि वुहानमध्ये पसरले, असे म्हटले जात आहे. हे झाल्यावर चीनकडे कोरोना चाचणीचे किट, पीपीई किट हे आधीच सिद्ध होते; कारण चीन कदाचित् चाचणीसाठी कोरोना त्यांच्याच देशात पसरवणार होता, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे चीनने जगाच्या तुलनेत काही मासांतच यावर नियंत्रण आणले, तसेच यावर लसही अन्य देशांच्या आधी चीनकडे सिद्ध झाली, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
पुढे काय ?
आता ९० दिवसांत चौकशी करण्याचा आदेश अमेरिका सरकारने दिल्यावर चीन संतापला आणि त्याने अमेरिकेवरच त्याच्या देशातील प्रयोगशाळांची चौकशी करण्याची मागणी केली. उद्या ९० दिवसांनंतर गुप्तचरांच्या अहवालात जर ‘कोरोनाची निर्मिती चीनने केली’, अशी पुराव्यांसह माहिती समोर आली, तर चीनचे पाऊल काय असू शकते ? हे लक्षात येते. चीनने जैविक महायुद्ध चालू केले आहे, असा सर्व जगाने या अहवालाच्या आधारे चीनवर ठपका ठेवला, तर त्यातून चीनने महायुद्ध छेडण्याचा प्रयत्न केला, तर आश्चर्य वाटू नये. कदाचित् चीनने ती सिद्धता आधीपासून केलीही असणार आहे; कारण अशी स्थिती उद्या येईल, असे त्याने गृहीत धरलेच असणार, हे नाकारता येत नाही. अशा वेळी जग एका विनाशाकडे जाईल, हे वेगळे सांगायला नको. आधीच चीन वगळता संपूर्ण जगाचे अर्थचक्र कोरोनामुळे ठप्प झाले आहे. त्यात महायुद्ध झाले, तर ते संपूर्ण जगाला परवडणारे नाही. अशा वेळी चीनला कोरोनाच्या उत्पत्तीसाठी उत्तरदायी ठरवल्यावर त्याची सर्व प्रकारे नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे येत्या ९० दिवसांत केवळ कोरोना निर्मितीचा शोध घेण्यासह चीन त्याचे नाव आल्यावर काय करू शकतो ? आणि त्यावर त्याची कोंडी कशी करता येईल ? याचाही विचार आतापासून अमेरिकेनेच नव्हे, तर संपूर्ण जगाने करण्याची आवश्यकता आहे. काही मासांपूर्वी एका व्यक्तीने चीनकडे कोरोनामुळे झालेल्या हानीसाठी अब्जावधी रुपयांची भरपाई मागितली होती. जर्मनीनेही तशी मागणी केली होती. चीनने साहजिकच याला भीक घातली नाही. त्यामुळे चीन हानीभरपाई देईल, याची शक्यता नाहीच. त्यामुळे चीनवर संपूर्ण जगाने बहिष्कार घालणेच योग्य ठरणार आहे. चीनने बंधने झुगारून युद्धच केले, तर त्यासाठीही जगाने सिद्ध रहायला हवे. त्यासाठी आतापासून नियोजन केले पाहिजे; कारण हातात केवळ ९० दिवस आहेत !