३५ व्या घटक राज्यदिनी काही ज्वलंत प्रश्न !
आपल्या एवढ्याशा गोव्याला वर्ष १९८७ मध्ये ‘घटकराज्या’चा मानाचा दर्जा मिळाला. त्याचा ३५ वा वर्धापनदिन ३० मे या दिवशी झाला. ४५० वर्षांच्या पोर्तुगिजांच्या अमानुष, नृशंस आणि भीषण जबरी धर्मांतरांनी अन् आपली मूळ भारतीय संस्कृती, संस्कार अन् परंपरा यांचा आमच्या सहस्रो पवित्र मंदिरांसह झालेल्या विध्वंसाने रक्ताळलेल्या गुलामगिरीतून झालेल्या आपल्या मुक्ततेचे हे साठावे वर्ष !
मुक्ततेच्या आणि घटकराज्य दर्जाच्या भक्कम आधारावर आपण गोव्याच्या समाजपुरुषावर, काँक्रिटची ‘विकासकामे’ करून उल्लेखनीय (?) साज चढवला. ४५० वर्षांच्या प्रदीर्घ गुलामगिरीने खचलेल्या, पिचलेल्या या समाजपुरुषाच्या ‘पिंडा’चे पोषण मात्र पूर्णतः दुर्लक्षित अन् उपेक्षितच राहिले. या ३५ व्या घटक राज्यदिनी आणि मुक्तीच्या साठीतही ज्वलंत, बोचणारे अन् ओरबाडणारे प्रश्न अजून भेडसावत आहेत.
१. समाजपुरुषाच्या पिंडाची आपला इतिहास आणि संस्कृती यांच्याशी नाळ जोडून त्याचे खर्या अर्थाने पोषण करणार्या मराठी अन् कोकणी मातृभाषांचे प्रथम प्राधान्याने रक्षण आणि संवर्धन का झाले नाही ?
२. गोव्याचा पोर्तुगीजपूर्व गौरवशाली इतिहास आपले बाल आणि तरुण यांच्यापर्यंत का पोचला नाही ?
३. गोव्याच्या उज्ज्वल मुक्तीसंग्रामाचा इतिहास अनिवार्यपणे पुढच्या पिढीत संक्रमित करण्यास आपण कसे अपयशी ठरलो ?
४. गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखणारा ‘ओपिनियन पोल’चा तपशील शिक्षणात कसा उतरला नाही ?
५. गोव्यातील राष्ट्रवादाचे जनक मानले गेलेले स्वातंत्र्यसेनानी स्व. टी.बी. कुन्हा यांनी टाहो फोडून मांडलेला ‘डिनॅशनलायजेशन ऑफ गोवन्स’चा देश पोखरणारा विषाणु वाढू नये म्हणून प्रकट प्रयत्न का केले नाहीत ?
६. पोर्तुगीज साम्राज्याच्या दास्यत्वाच्या अपमानकारक खुणा आपण पुसून का नाही काढू शकलो ?
७. आपल्या पूर्वजांशी, भारतीय इतिहासाशी आणि गोव्याच्या खर्या मूळ संस्कृतीशी जोडली गेलेली वारसास्थळे अजून का उपेक्षेने सडत आहेत ?
८. गोवा मुक्त झाला; पण मये गाव अद्याप पोर्तुगीज पारतंत्र्यात खितपत का पडू दिला ?
नुसते स्वातंत्र्य किंवा मुक्ती मिळून अर्थ नसतो, तर ते स्वातंत्र्य टिकवण्याची आणि जोपासण्याची इच्छाशक्ती, क्षमता अन् पात्रता समाजात आणि लोकप्रतिनिधींत असावी लागते हेच खरे !
– प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर, पणजी, गोवा.