युवकांनो, ‘विनामूल्य’ची मानसिकता त्यागा !

‘कोणतीही गोष्ट विनामूल्य मिळाल्यास त्याची किंमत रहात नाही’, अशी म्हण आहे. कोणत्याही गोष्टीसाठी किंमत मोजल्यास ती योग्य पद्धतीने वापरली जाते किंबहुना ती योग्य पद्धतीने वापरायला हवी, याची जाण मनात असते. दुर्दैवाने भारतात आज सरकारकडून काही गोष्टी विनामूल्य देण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे युवावर्गाची होणारी हानी, विनामूल्य का नको ? हे पाहूया, तसेच स्वित्झर्लंड येथील जनतेने विनामूल्य गोष्टींचा त्याग का केला ? हे लक्षात घेतल्यास आपल्यालाही विनामूल्य का नको ? याचे महत्त्व लक्षात येईल.

श्री. राहुल कोल्हापुरे

बालवाडीपासून ते युवकांपर्यंत ‘विनामूल्य’ मानसिकता

आज बालवाडीतील मुलांना विनामूल्य अंडी, मसाले भात, बदामाचा शिरा, मसाले दूध दिले जाते. पुढे तरुणपणी १० रुपयांत जेवण, १०० युनिटपर्यंत विनामूल्य वीज, विनामूल्य शिधा (रेशन), सरसकट कर्जमुक्ती या गोष्टींमुळे एका ठराविक वर्गातील युवकांच्या मानसिकतेवर याचा घातक परिणाम होऊ शकतो.

सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातील युवक विविध व्यसनांच्या आहारी गेले आहेत. राज्यात गुटखाबंदी असूनही युवकांच्या तोंडात गुटखा, हातात ‘अँड्रॉइड’ भ्रमणभाष आणि फिरण्यासाठी गाडी असते. हे युवक शहरातील चौकाचौकांत किंवा गावाच्या पारावर राजकारण्यांच्या ‘मिमिक्री’ करण्यापासून ते चौकातील ‘फ्लेक्स’वर कोणत्या ‘पोज’मध्ये छायाचित्र छापायचे, या चर्चेत मग्न असतात.

कष्टाविना फळ नाही !

कोणतीही गोष्ट आयती मिळत नाही, तर त्यासाठी कष्ट करावेच लागतात. स्वत:ला मिळणार्‍या विनामूल्य गोष्टींसाठी लागणारा निधी कुणाच्या ना कुणाच्या तरी कष्टातूनच उभारलेला असतो, हे लक्षात घ्यायला हवे. यामध्ये उद्योजक, शेतकरी आणि सामान्य नागरिक असे अनेक जण असू शकतात.

देशात सध्या अनुमाने ६७ टक्के लोकसंख्या युवावर्गातील आहे. महाराष्ट्रातही युवावर्ग अधिक आहे. निवडणुकीच्या काळात युवकांना प्रतिमास ६०० रुपये, मद्य, जेवण आणि फिरण्यासाठी गाडी दिली जाते. ज्या वयात स्वत:चे भविष्य घडवण्यासाठी अपार कष्ट करायला हवेत, त्या वयात अशा सवयी लागल्यास त्यांची विधायक क्रयशक्ती नष्ट होते.

स्वित्झर्लंडचा आदर्श घ्या !

विनामूल्य मानसिकतेचा त्याग केलेल्या स्वित्झर्लंडचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंड सरकारने ३ वर्षांपूर्वी सरकारी तिजोरीत पडून असलेली गलेलठ्ठ रक्कम प्रतिमाह विनामूल्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र तेथील ७७ टक्के सूज्ञ आणि देशभक्त नागरिक यांनी हा पैसा नाकारला. त्याचे कारण एवढेच होते की, देशातील युवकांची क्रयशक्ती अल्प होऊन देशाचे भविष्य अंधारात लोटले जाईल. आपल्याला स्वित्झर्लंडमधील सौंदर्य आणि सुबत्ता दिसते. त्यामागे तेथील जनतेची देशभक्ती, नागरिकांची जिद्द, स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठा आदी गुणही पहायला हवेत. यातून एक भाग लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे जे कष्टाने मिळवतो आणि फुकट घेण्याची अपेक्षा ठेवत नाही, तेथेच नवीन निर्मिती होऊ शकते. असे नागरिकच देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जातात. त्यामुळे फुकटचे घेण्याची मानसिकता त्यागून आणि कष्ट करून नवनिर्मितीची मानसिकता जोपासणे आवश्यक आहे, तरच देश खर्‍या अर्थाने महासत्ता होईल.

भारताचा इतिहास अभ्यासा !

सर्वांनी भारताच्या इतिहासाची उजळणी करण्याची आवश्यकता आहे. त्याद्वारे आपल्या पूर्वजांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आणि शौर्याची पराकाष्ठा डोळ्यांसमोर उभी रहाते. यातूनच युवकांच्या मनामनांत प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिष्ठा प्रज्वलित होऊन युवक स्वाभिमानी अन् ध्येयनिष्ठ होतील, तसेच विनामूल्य मिळणार्‍या सर्व गोष्टींचा त्याग करून ‘मला विनामूल्य काही नको’, असे अभिमानाने सांगतील.

युवकांनो ‘विनामूल्य’ मिळण्याविषयीची मानसिकता पालटा !

खाण्यासाठी पैसे नाहीत, वीजदेयक देण्यासाठी पैसे नाहीत, अशी स्थिती अपवाद वगळता सर्वत्र नाही. त्यामुळे सरकारलाही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात देण्याविषयी बाध्य केले पाहिजे.

संतांनी म्हटले आहे, ‘रिकामे मन हे सैतानाचे घर असते.’ त्यामुळेच समाजात दुराचार, भ्रष्टाचार, व्यभिचार, बलात्कार, हत्या, दरोडे, दंगली आदी वाढत आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीऐवजी हानीच अधिक होत आहे. आपल्याला स्वत:ला आणि देशाला संपन्न अन् विकसित करून प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर सगळेच ‘विनामूल्य’ मिळवण्याची मानसिकता पालटली पाहिजे. युवकांनी मनापासून ‘विनामूल्य’ त्यागण्याचा निश्चय करून राष्ट्रोद्धार आणि राष्ट्रोत्थान यांसाठी सिद्ध झाले पाहिजे.

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा