शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना न्यायालयाकडून ६ मासांची शिक्षा !
संभाजीनगर येथील हिंदु-मुसलमान जातीय दंगलीचे प्रकरण
संभाजीनगर – वर्ष २०१८ मध्ये शहरात झालेल्या हिंदु-मुसलमान जातीय दंगलीच्या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी येथील शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना जिल्हा सत्र न्यायालयाने ६ मासांची शिक्षा आणि ५ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणाचे पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांनी अन्वेषण करून न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते.
११ आणि १२ मे २०१८ या २ दिवशी शहरातील शहागंज भागात हिंदु आणि मुसलमान समाजांत जातीय दंगल झाली होती. यामध्ये धर्मांधांनी अनेक दुकानांची तोडफोड करत काही दुकाने जाळली होती. यात काही नागरिकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर येथील २ हिंदु तरुणांना अटक केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर रात्री ११ वाजता आमदार जैस्वाल हे पोलीस ठाण्यात आले.
या वेळी पोलीस अधिकार्यांशी चर्चा करतांना आमदार जैस्वाल यांनी ‘पोलीस केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करत आहेत. त्यांना त्वरित सोडून द्यावे’, अशी मागणी केली होती. तथापि, ‘आमदार जैस्वाल यांनी पोलिसांना शिवीगाळ करून पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारासमोरील पटलावरील काच फोडून सरकारी कामात अडथळा आणला आहे’, असा आरोप ठेवून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी विविध कलमांद्वारे त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.