देवद आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया चव्हाणआत्या (वय ८५ वर्षे) यांनी स्वतःला पालटण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन
‘श्रीमती विजया चव्हाणआत्या यांनी १६.७.२०१९ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले होते. त्या अधिक वयाच्या असल्याने व्यष्टी साधनेचा आढावा वयस्कर साधकांच्या गटातून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना देतात. ३ – ४ मासांपूर्वी आत्यांचा मनाप्रमाणे करण्याचा भाग तीव्र होता. त्यांच्या मनाप्रमाणे न झाल्यास त्या भराभर प्रतिक्रिया व्यक्त करत. त्यांना पुष्कळ राग यायचा. त्यांना परिस्थितीतील पालट सहनच व्हायचा नाही. ‘तुम्ही अस कसं करता ? मी सांगितले आहे, ते व्हायलाच पाहिजे’, अशी त्यांची भूमिका असे.
स्वतःला पालटण्यासाठी त्यांनी या वयात पुष्कळ परिश्रम घेतले आहेत. त्या प्रतिदिन लहान-लहान प्रयत्न लिहून ठेवतात. त्यांनी केलेले प्रयत्न साधकांना प्रेरणादायी आहेत. आत्यांनी या वयात केलेले लिखाण त्यांच्या विचारांची दिशा दर्शवते. त्यांचे लिखाण आणि त्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
१. नियोजनातील पालट ‘ईश्वरेच्छा’ म्हणून शांतपणे स्वीकारणे
१ अ. प्रसंग क्र. १
१ अ १. अधिकोषात जाण्याविषयीच्या प्रसंगाचे श्रीमती चव्हाणआत्या यांनी केलेले लिखाण : मला अधिकोषात जायचे असल्याने उत्तरदायी साधिकेला विचारून मी वाहनाचे आरक्षण केले. मला सोबत हवी असल्याने माझ्या समवेत अधिकोषात येणार्या साधकाचेही मी आरक्षण केले. ‘सकाळी १० वाजता माझ्या समवेत श्री. डोंगरे येणार’, असे ठरले. त्या वेळी वाहनाची सेवा करणार्या साधकाने ‘सकाळी १० च्या ऐवजी दुपारी १२.३० ला गेले, तर चालेल का ?’, असे विचारले. तेव्हा मी म्हणाले, ‘‘मला वेळ कोणतीही चालेल; परंतु माझ्या समवेत येणार्या साधकाला, म्हणजे श्री. डोंगरे यांना ‘दुपारी १२.३० ची वेळ चालेल का ?’, हे विचारायला हवे.’’ वाहनाची सेवा करणार्या साधकाने श्री. डोंगरे यांना भ्रमणभाष करून विचारले असता त्यांनी ‘दुपारी १२.३० वाजता यायला मला शक्य होणार नाही’, असे सांगितल्याने माझे अधिकोषात जाणे रहित झाले.
त्यानंतर उत्तरदायी साधिकेने माझ्या समवेत येण्यासाठी सौ. खळतकर यांचे नाव सुचवले. हे मला दुसर्या दिवशी समजले. तेव्हा अधिकोषात जाण्याच्या वेळी सौ. खळतकर मला भेटायला आल्या आणि म्हणाल्या, ‘‘मला तुमच्या समवेत अधिकोषात जायला सांगितले आहे; परंतु माझी अडचण तुम्ही अगोदर समजून घ्या. आजऐवजी उद्या अधिकोषात गेलो, तर चालेल का ? कारण आज अमावास्या आहे. मला अमावास्येला आध्यात्मिक त्रास होतो.’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘मी अधिकोषात जाण्याची सिद्धता केली आहे. हा पालट आपण मनाने करून चालणार आहे का ? उत्तरदायी साधिकेला, तसेच वाहनाची सेवा करणार्या साधकाला सांगायला हवे.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी हे करते.’’ त्यांनी वाहनाची सेवा करणार्या साधकाला सांगितले, ‘‘आज आम्ही येणार नाही’’, तसेच उत्तरदायी साधिकेलाही सांगितले आणि अधिकोषात जाणे रहित झाले.
या वेळी मी देवाला प्रार्थना केली, ‘आता मी काहीच करू शकत नाही. ‘यामध्ये तुझे कसे नियोजन आहे ?’, तसे घडू दे. कर्ता-करविता तूच आहेस. जे घडले, ते मला शांत मनाने स्वीकारता आले, ही तुझी कृपा आहे.’ त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करून मी शांत राहिले.
पूर्वी मी एका साधिकेला तिच्या अडचणीच्या वेळी काही पैसे दिले होते. वरील प्रसंग घडला, त्याच दिवशी तिने माझे पैसे मला परत केले. या प्रसंगातून मला शिकायला मिळाले, ‘कर्ता-करविता देवच आहे. मला शांत रहाण्याची बुद्धी देऊन देवाने माझी पैशांची अडचण दूर केली.’
१ अ २. वरील प्रसंगावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन
अ. आत्या छोटे-छोटे प्रसंग कसे लिहितात बघितले ! या वयामध्ये त्यांचे हात थरथरतात, तरी त्यांच्यातील तळमळीमुळेच त्या लिहू शकतात.
आ. ‘देवाचे नियोजन काय असते ?’, हे या प्रसंगावरून लक्षात आले. सर्वसाधारणपणे देवाच्या नियोजनापर्यंत आपण पोचतच नाही. स्वेच्छेची तीव्रताच एवढी असते की, परेच्छा आणि ईश्वरेच्छा हे दोन टप्पे तर लांबच राहिले. ‘आपल्या मनाप्रमाणे झाले पाहिजे’, असे आपल्याला वाटते आणि तसे झाले नाही, तर स्वभावदोषांचे प्रकटीकरण होते.
इ. येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे, पैशांची आवश्यकता असतांना आत्यांनी उत्तरदायी साधिकेला विचारून वाहनाचे आरक्षण केले. सर्वसाधारणपणे साधक स्वतःला कुठे बाहेर जायचे असल्यास आधी वाहनाचे आरक्षण करतात आणि नंतर येऊन उत्तरदायी साधकाला सांगतात, म्हणजे स्वतःच्या मनाने आधी कृती करतात आणि नंतर अनुमती घेतात. या प्रसंगात आत्यांनी आधी विचारले. त्यामुळे त्यांची साधना झाली.
ई. ‘सोबत कुणीतरी साधक लागणार’, याविषयी त्यांनी उत्तरदायी साधिकेला विचारले. यामध्ये त्यांनी मनाने न ठरवता उत्तरदायी साधकांना विचारले.
उ. वाहनाची सेवा करणार्या साधकाने अधिकोषात जाण्याची वेळ पालटल्यावर आत्यांनी ‘मला कोणतीही वेळ चालेल; परंतु माझ्या समवेत येणार्यांना ही वेळ चालेल का ?’, हे विचारायला हवे’, असे सांगितले. यामध्ये त्यांच्यातील ‘इतरांचा विचार करणे’ हा गुण दिसून येतो. आत्यांच्या प्रत्येक वाक्यात त्यांचे काहीतरी दृष्टीकोन आहेत. याचा अभ्यास केला पाहिजे.
दुसर्या दिवशी साधिकेने जायच्या वेळेला आत्यांना विचारले, ‘‘आपण उद्या गेले, तर चालेल का ? आज अमावास्या आहे.’’ त्या वेळी आत्या म्हणाल्या, ‘‘हा पालट आपण मनाने करून चालणार नाही. उत्तरदायी साधिकेला आणि वाहनाची सेवा करणार्या साधकाला तसे सांगायला हवे.’’ या वयात आत्यांना बाहेर जाण्यासाठी सिद्ध होण्यास पुष्कळ वेळ द्यावा लागतो आणि असे असतांना सिद्ध झाल्यावर ऐन वेळी बाहेर जाणे रहित झाले. हे स्वीकारण्यासाठी मनाची स्थिती पुष्कळ सक्षम असावी लागते.
प्रत्यक्षात आत्यांना पैसे पाहिजे होते; म्हणून त्यांना अधिकोषात जायचे होते. पहिल्या आणि दुसर्या दिवशी अधिकोषात जायचे रहित झाले. ते त्यांनी देवाचे नियोजन म्हणून स्वीकारले. त्यानंतर दुसर्या दिवशी सायंकाळी एका साधिकेला पूर्वी अडचणीच्या वेळी दिलेले पैसे त्यांना परत मिळाले. देवाने आत्यांना केलेले साहाय्य येथे लक्षात येते.
ऊ. यामध्ये ‘आत्यांची परेच्छेने वागण्याची वृत्ती किती आहे !’, हे दिसून येते, तसेच येथे इतरांचा विचार पुष्कळ आहे. डोंगरेकाकांना शक्य नाही, तर ठीक आहे. साधिका म्हणाली, ‘‘आज नको’’, तर ठीक आहे. वाहनाची सेवा करणार्या साधिकेने वेळ पालटली, तरीही ठीक आहे. परेच्छेने वागण्याचे प्रमाण किती आहे !
येथे आपल्याला स्थुलातून परेच्छा दिसत आहे; पण त्यांच्यातील भावामुळे त्या ती ईश्वरेच्छाच समजतात. ईश्वरेच्छा ही परेच्छेच्या पुढच्या टप्प्याची असते.
ए. त्यांच्याजवळ पैसे नव्हते; म्हणून त्यांना अधिकोषात जाणे आवश्यक होते. अन्यथा त्यांना अधिकोषात जाण्याचे काही कारणच नव्हते. पावसाळ्याच्या दिवसांत एवढ्या दूर अधिकोषात जाणे त्रासदायक आहे; पण त्यांनी आलेल्या अडचणींचा कुठेच बाऊ केला का ? ‘आता माझे कसे काय होणार ?’, असा विचार त्यांच्या मनात आला का ? त्यांचा ‘स्व’चा विचार कुठे दिसतो का ? एवढ्या अडचणीतसुद्धा प्रत्येक ठिकाणी त्यांनी इतरांचाच विचार केला आहे.
ऐ. प्रत्येक परिस्थितीत देवाच्या कृपेने त्यांना शांत रहायला जमले. त्याविषयी त्यांनी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांना देवाच्या कृपेमुळे प्रसंग सगळे स्वीकारता आले.
ओ. समजा, ‘अधिकोषात जाणे रहित झाले, तर कुणाकुणाला त्रास होईल ? कुठे कुठे सांगायला पाहिजे ?’, हे त्यांना या वयातही पटकन सुचते. त्यांच्या मनात हे विचार सहजतेने आलेले आहेत. ‘सर्वकाही देवाच्या इच्छेने होते, तर आपण ते स्वीकारायला पाहिजे’, असा त्यांचा विचार आहे.
येथे त्यांनी पहिल्या दिवशी अधिकोषात जाण्याविषयी विचारले आणि नियोजन केले. दुसर्या दिवशी त्यांचे रहित झाले. दुसर्या दिवशी संध्याकाळी साधिकेने पैसे आणून दिले. तेव्हा त्यांचा अधिकोषात जाण्याचा प्रश्नच सुटला. ‘देवाचे नियोजन कसे आहे !’, हे यातून लक्षात येते. सकारात्मक राहून प्रसंग स्वीकारल्यावरच ‘देवाचे नियोजन काय असते ?’, हे अनुभवता येते.
१ आ. प्रसंग क्र. २
१ आ १. ‘सासूबाईंची सेवा करणार्या साधिकेला साहाय्य करणे’ या प्रसंगाविषयी श्रीमती चव्हाणआत्या यांनी केलेले लिखाण : आज मला स्नान उशिरा करावे लागले. एका साधिकेच्या सासूबाईंना बरे नव्हते. त्यामुळे त्यांना स्नान घालून साधिकेला सेवेला जायचे होते. माझी स्नानाची वेळ पहाटे ५ वाजताची असल्याचे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी मला विचारले, ‘‘मला माझ्या आजारी सासूबाईंना स्नान घालून प्रसाराला जायचे आहे. तुम्ही नंतर स्नान करू शकाल का ?’’ सासूबाईंना स्नान घालण्याची सेवा करणारी सून पाहून मला आनंद झाला. मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही अवश्य त्यांना अगोदर स्नान घाला. मी नंतर करू शकते.’’ हे ऐकून त्यांना आनंद झाला. ‘माझे मन पालटण्यासाठी देव मला किती संधी देतो !’, याविषयी देवाची कृतज्ञता करण्यासाठी शब्द अपुरे पडतात’, असे मला जाणवले.
१ आ २. वरील प्रसंगावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन
अ. या प्रसंगातील प्रत्येक टप्प्याला ‘परेच्छेने वागणे म्हणजेच ईश्वरेच्छा जाणणे’, हे आत्यांना उमजले; म्हणून त्यांनी आनंद अनुभवला. ‘सध्याच्या काळातील एक साधिका स्वतःच्या वयस्कर सासूबाईंना स्नान घालते’, हे पाहून त्यांना अधिक आनंद झाला.
आ. ‘माझे मन पालटण्यासाठी देव मला किती संधी देतो !’, हे त्यांचे वाक्य पहा. ‘देवाने मला पालटण्यासाठी संधी दिली’, याचा त्यांना अधिक आनंद आहे.
इ. प्रसंग आल्याविना परीक्षा होत नाही.
ई. वयस्कर साधकांचे नियोजन ठरलेले असते. त्यात हस्तक्षेप झालेला त्यांना मुळीच चालत नाही; मात्र चव्हाणआत्यांनी स्वतःला दृष्टीकोन दिला आहे आणि नियोजनातील पालट सहज स्वीकारला आहे.
उ. ‘माझे मन पालटण्यासाठी देव मला किती संधी देतो !’, याविषयी त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. ‘माझे मन पालटण्यासाठी देव मला किती संधी देतो !’, असे म्हणणे’, म्हणजे ‘प्रत्येक प्रसंग देव मला शिकण्यासाठीच घडवतो’, यावर दृढ श्रद्धा असणे. यावरून ‘आत्यांनी अल्प कालावधीत ६१ टक्के आध्यात्मिक पातळी का गाठली ?’, यामागील कारण लक्षात येते.
२. स्वेच्छेऐवजी आज्ञापालन म्हणून परेच्छेने वागल्याने आनंद मिळत असल्याचे लक्षात येणे
२ अ. ‘स्वेच्छा बाजूला ठेवून आज्ञापालन म्हणून सांगितलेली सेवा करणे’, या प्रसंगाविषयी श्रीमती चव्हाणआत्या यांचे लिखाण : ‘२३.८.२०१९ या दिवशी नेहमीप्रमाणे मी ठरलेली जपमाळ बनवण्याची (स्वेच्छा) सेवा चालू केली. तेवढ्यात ‘तातडीची सेवा करायला घ्या’, असे सांगण्यात आले. त्यानुसार ‘स्वेच्छा’ बाजूला ठेवून आज्ञापालन म्हणून मी मेणाच्या डब्यांची सेवा चालू केली. त्यातही मला आनंद वाटला. त्या वेळी माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘देवा, तू आता आम्हाला ‘मन’ पालटण्याची संधी देऊन पालट घडवून आणत आहेस. तुला आमची किती काळजी आहे !’, याची जाणीव होऊन मला आनंद झाला. (ही सद्गुरु राजेंद्रदादांची शिकवण आहे.)’
२ आ. वरील प्रसंगावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन : आत्यांची नियमित आणि आवडीची जपमाळ बनवण्याची सेवा चालू असतांना ऐन वेळी सेवेत झालेला पालट त्यांनी सहज स्वीकारला. परिस्थिती स्वीकारतांना आत्यांनी त्यांच्या मनाला दिलेला दृष्टीकोन अधिक प्रभावी आहे. यातूनही त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून आनंद घेतला आहे. हे विशेष आहे.
साधकाला घडण्यासाठी सर्व परिस्थिती अनुकूल असते; मात्र अहंमुळे ती त्याला अयोग्य वाटते. ‘देव आपल्यासाठी प्रसंग घडवतो’, हे त्या त्या प्रसंगात स्वतःला कळले पाहिजे किंवा तसे न उमजल्यास ‘प्रसंगातून काय शिकायचे ?’, हे इतरांना विचारले पाहिजे. त्या प्रसंगातून देवाची लीला अनुभवली पाहिजे. भगवंताची लीला अनुभवणे, हीही साधना आहे.
३. कृतीला भावाची जोड दिल्यावर त्यातून आनंद घेता येणे
३ अ. सेवेला गेल्यावर सेवाच जणू प्रतीक्षा करत असल्याचे जाणवल्याविषयी श्रीमती चव्हाणआत्या यांचे लिखाण : ‘२४.८.२०१९ या दिवशी मेणाच्या डब्यांची सेवा जणू प्रतीक्षा करत असल्याचे मला जाणवले. ‘मी कोणती सेवा करू ?’, असे विचारण्याच्या आतच मेणाच्या डब्या जणू प्रतीक्षेत असल्यासारखे वाटले आणि मी मेणाच्या डब्यांची सेवा चालू केली. ‘देव सेवा देतो आणि त्यासमवेत आनंदही देतो’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता आपोआप व्यक्त झाली.’
३ आ. वरील प्रसंगावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन : ‘कृतीला भावाची जोड द्या !’, असे जे सांगितले जाते, त्यानुसार आत्यांनी कृतीला भावाची जोड दिल्याने त्यांनी ही स्थिती अनुभवली. त्यामुळे त्यांना त्यातून सहज आनंद घेता आला.’
संकलक : (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१०.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |