बाललैंगिकतेचा प्रसार करणार्या ‘बॉम्बे बेगम्स’ वेब सीरिजवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती
|
मुंबई – ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी फ्लॅटफॉर्म’वर चालू असलेल्या ‘बॉम्बे बेगम्स’ या वेब सीरिजमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अश्लील छायाचित्र पहाणे, लहान मुलांनी अमली पदार्थांचे सेवन करणे आदी भडक आणि आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. समाजात लैंगिक अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण वाढत असतांना या वेब सीरिजमधून बाललैंगिकतेचा प्रसार करणे म्हणजे बालकांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देण्याचा प्रकार आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीर नोंद घेऊन ‘बॉम्बे बेगम्स’ या वेब सीरिजवर त्वरित बंदी घालावी, तसेच या वेब सीरिजचे निर्माते अन् प्रसारक ‘नेटफ्लिक्स’ यांच्यावरही ‘बाल न्याय अधिनियम २०१५’ कलम ७७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. यासाठी समितीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग’ यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.
‘बॉम्बे बेगम्स’ या वेब सीरिजच्या निर्मात्या अलंकृता श्रीवास्तव असून मुख्य भूमिकेत अभिनेत्री पूजा भट आहेत. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने महाराष्ट्राचे गृह सचिव आणि मुंबई पोलीस यांना पत्र लिहून या वेब सीरिजच्या निर्मात्यांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेशही दिला आहे. हा प्रकार गंभीर असून बाललैंगिकतेच्या प्रसाराला पायबंद घालण्यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी समितीने केली आहे.