कराडमध्ये ८ सहस्रांहून अधिक इमारतींवर सौरऊर्जा संयंत्र !
कराड – कराड नगरपालिकेने स्वत:च्या इमारतीवर १२० सौरऊर्जा संयंत्र बसवल्यामुळे पालिकेची सर्व यंत्रणा आता सौरऊर्जेवरच चालू आहे. त्यामुळे पालिकेची बचत होत आहे. पालिकेचा आदर्श घेऊन शहरातील ८ सहस्रांहून अधिक नागरिकांनी स्वत:च्या इमारतींवर सौरऊर्जा संयंत्र बसवून कार्यान्वित केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होऊ लागली आहे, असे कराड नगरपालिकेने केलेल्या एका पहाणीतून सांगितले.
कराड नगरपालिकेच्या वतीने नुकतेच ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये शहरातील पहाणी केलेल्या १९ सहस्र मिळकत धारकांपैकी ८ सहस्र मिळकत धारकांनी सौरऊर्जा संयंत्र उपयोगात आणले असल्याचे पुढे आले आहे. पालिकेने पर्यावरणाविषयी जागृती बाळगणार्या अशा मिळकत धारकांना प्रोत्साहन म्हणून मालमत्ता करात ५ टक्के सूट जाहीर केली आहे. पालिकेने स्वत: कृती करत शहरामध्ये सौरऊर्जा संयंत्राविषयी जागृकता निर्माण केली. नागरिकांनी स्वत:हून सौरऊर्जा संयंत्रे बसवून पर्यावरण रक्षणासाठी पाऊल उचलले आहे.