तमिळनाडूचे अर्थमंत्री पी.टी.आर्. पलनीवेल यांच्याकडून गोमंतकियांची माफी मागण्यास नकार
‘जी.एस्.टी.’ मंडळाच्या बैठकीत गोव्याला अधिक महत्त्व न देण्याचे वक्तव्य केल्याचे प्रकरण
पणजी, ३० मे (वार्ता.) – देशाच्या ४३ व्या ‘माल आणि सेवा कर’ (जी.एस्.टी.) मंडळाच्या २९ मे या दिवशी झालेल्या बैठकीत तमिळनाडूचे अर्थमंत्री पी.टी.आर्. पलनीवेल यांनी ‘जी.एस्.टी.’ साठी गोव्यासारख्या लहान राज्याला विनाकारण अधिक महत्त्व न देण्याचे आवाहन केले होते. यावरून गोव्याचे वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी तमिळनाडूचे अर्थमंत्री पी.टी.आर्. पलनीवेल यांनी गोमंतकियांची माफी मागण्याची मागणी केली होती. तमिळनाडूचे अर्थमंत्री पी.टी.आर्. पलनीवेल यांनी ३० मे या दिवशी या प्रकरणी गोमंतकियांची माफी मागण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत ‘रिकामे भांडे अधिक आवाज करते’, अशा शब्दांत गोव्याचे वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांच्यावर टीका केली.
वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी २९ मे या दिवशी ‘जी.एस्.टी.’ मंडळाच्या बैठकीत मंडळाने गोव्यासारख्या लहान राज्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन निराळा ठेवण्याची मागणी केली होती. कोरोना महामारीमुळे गोव्यातील पर्यटन उद्योग, तसेच खाण उद्योग बंद आहेत. महसूल घटल्याने राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंडळाने गोव्याला भरपाई रक्कम द्यावी, अशी मागणी केली होती. या वेळी तमिळनाडूचे अर्थमंत्री पी.टी.आर्. पलनीवेल यांनी वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांच्या विधानाला आक्षेप घेत आकाराने मोठे राज्य असल्याने तमिळनाडू राज्याला ‘जी.एस्.टी.’ मंडळामध्ये अधिक अधिकार देण्याची मागणी केली होती.