राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात ! – देवेंद्र फडणवीस
मुंबई – केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष अन् नाकर्तेपणा यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अन्य मागासवर्गीय समाजासाठी असलेले आरक्षण संपुष्टात आले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, अन्य मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडीने मुळीच गांभीर्य दाखवले नाही. सुनावणी चालू असतांना १५ मासांत सरकारने केवळ ८ वेळा तारखा मागितल्या. एका सुनावणीमध्ये न्यायालयाने ‘राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग गठीत करून प्रायोगिक माहिती सिद्ध करून आरक्षणाचे समर्थन करावे’, असे नमूद केले; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. ५ मार्च २०२१ या दिवशी विधीमंडळाच्या सभागृहात हा विषय मी मांडला होता. याविषयी बैठकही झाली; मात्र कारवाई न करता सरकारने केवळ पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. आता सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे अन्य मागासवर्गीय समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी सरकारने त्वरित कार्यवाही करावी.