हिंदुविरोधी बिनदिक्कतपणाला आवर घाला !
या देशात केवळ हिंदूंचीच श्रद्धास्थाने आणि आदर्श मूल्ये यांचे विडंबन होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुलामाखाली कधी यथेच्छ हिंदुद्वेष, तर कधी इतिहास पालटण्याचा खोडसाळपणा केला जातो. सातत्याने घडणार्या घटना ही प्रतिमा गडद करतात. नुकतेच दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी हिंदूंचे आदर्शस्थान छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बिनदिक्कतपणे आक्षेपार्ह लिखाण केले. ‘बिनदिक्कतपणे’ हा शब्द वापरण्याचे प्रयोजन हे की, तोलूनमापून न लिहिल्याने काय होते ? याचा कटू अनुभव गिरीश कुबेर यांनी यापूर्वी एकदा घेतला आहे. तरीही पुन्हा लिखाण करणे, याला बिनदिक्कतपणाच म्हणावा लागेल. मागील अनुभवाच्या वेळी एका दिवसात स्वत:चे लिखाण मागे घेण्याची नामुष्की गिरीश कुबेर यांच्यावर आली होती, आता मात्र विरोध होऊनही कुबेर गप्प आहेत. यातूनच त्यांच्या बिनदिक्कतपणाचे कारण उघड होते. ‘असंतांचे संत !’ या मथळ्याखाली मदर तेरेसा यांच्यावर टीका केल्यानंतर कट्टरपंथियांच्या दबावापुढे गिरीश कुबेर यांना झुकावे लागले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात धादांत खोटे लिखाण केल्यानंतर सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध होत असतांनाही कुबेर थंड आहेत; याला ‘हिंदूंची सर्वज्ञात सहिष्णुता’ हेच कारण असण्याला दुमत नसावे !
शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण करण्याचे धाडस होतेच कसे ? हा प्रश्न सर्वत्रच्या हिंदूंनी खडसावून उपस्थित करायला हवा. सध्या गिरीश कुबेर यांच्या विरोधात ठिकठिकाणी तक्रारी देणे चालू आहे. मग हिंदूंसमोर काही पर्यायच नाही का ? अर्थात्च ‘हिंदूंचे प्रभावी संघटन’ हाच पर्याय सध्याची परिस्थिती सूचित करते आहे. हिंदूंनी गिरीश कुबेर यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करण्यास पोलिसांना भाग पाडायला हवे. ‘लोकसत्ता’च्या समूहाकडूनही हिंदूंच्या मागणीची नोंद घेतली जाईल, यासाठी वैध मार्गाने विविधांगी प्रयत्न करायला हवेत. प्रसाराचे प्रभावी माध्यम असलेल्या सोशल मिडियावरून गिरीश कुबेर यांचा निषेध नोंदवायला हवा. सर्वत्रच्या हिंदूंचे सामायिक प्रयत्न ‘हिंदूंच्या निद्रिस्त’ प्रतिमेला छेद देतील, यात शंका नाही !
– कु. प्राजक्ता धोतमल, पनवेल