साधकांनी नामजपादी उपायांना बसतांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसावे !
साधकांना सूचना
‘सनातनचे आश्रम, सेवाकेंद्रे किंवा साधकांची निवासस्थाने येथे साधक प्रतिदिन स्वतःवर नामजपादी उपाय होण्यासाठी बसतात. आश्रम किंवा सेवाकेंद्र येथे एखादे उन्नत (उदा. संत किंवा ‘६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक’) नामजपासाठी बसतात आणि त्यांच्यासमोर अन्य साधक आध्यात्मिक लाभ होण्यासाठी नामजपाला बसतात. उपायांचा लाभ होण्यासाठी नामजपाला बसतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. आश्रम किंवा सेवाकेंद्र येथे जेथे उन्नत नामजपाला बसतात, तेथे बसण्याची रचना पूर्व-पश्चिम असावी. यामध्ये उन्नतांनी नामजपाला बसतांना शक्यतो पश्चिमेकडे तोंड करून बसावे. अशा वेळी त्यांच्यासमोर उपाय होण्यासाठी नामजपाला बसणार्या साधकांनी उन्नतांकडे तोंड (पूर्वेकडे तोंड) करावे. ही रचना शक्य नसल्यास उन्नत पूर्वेकडे तोंड करून बसले, तरी चालतील. तेव्हा उपाय होण्यासाठी नामजपाला बसणार्या साधकांनी उन्नतांकडे तोंड (पश्चिमेकडे तोंड) करावे.
२. साधकांनी त्यांच्या निवासस्थानी किंवा अन्य ठिकाणी वैयक्तिक स्तरावर नामजपाला बसतांना शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि ते शक्य नसल्यास पश्चिमेकडे तोंड केले, तरी चालेल.
३. ज्यांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसणे शक्य होणार नाही, त्यांनी उत्तर दिशेला तोंड करून बसावे; पण दक्षिण दिशेला तोंड करून नामजप करू नये.
४. नामजप करण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून बसल्यास अनिष्ट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता बळावते आणि तेव्हा आपण नामजप करू शकत नाही. दक्षिण दिशेकडून त्रासदायक स्पंदने येत असतात. याउलट पूर्व आणि पश्चिम या दिशांकडून चांगली स्पंदने येत असतात. त्यामुळे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसल्यामुळे नामजप चांगला होतो, तसेच अनिष्ट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता उणावते. तेव्हा नामजपाचा सर्वाधिक प्रमाणात आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२१)