शेवटच्या क्षणापर्यंत नामजप आणि गुरुस्मरण यांचा ध्यास असलेले हडपसर (पुणे) येथील कै. राजेंद्र पद्मन !

हडपसर (पुणे) येथील राजेंद्र पद्मन यांचे ५.४.२०२१ या दिवशी कोरोनामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्याविषयी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कै. राजेंद्र पद्मन

१. प्रांजळपणा

‘पुणे जिल्ह्यातील सर्व साधकांसाठी झालेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या सत्संगात पद्मनकाका प्रांजळपणे त्यांच्या मनाची स्थिती आणि साधनेचे प्रयत्न सांगायचे. ते प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्नही करायचे.

२. रुग्णाईत आईची मनापासून सेवा करणे

पद्मनकाकांनी त्यांच्या आईची अनेक वर्षे भावपूर्ण सेवा केली. त्याविषयी त्यांच्या मनात कुठलेही गार्‍हाणे नसायचे. त्यांचेही वय झाले होते, तरीही शेवटपर्यंत त्यांनी वयस्कर आईची सेवा मनापासून केली.

३. इतरांचा विचार करणे

आपत्कालीन स्थितीमध्ये साधकांना साहाय्य होण्यासाठी ते अनेक सूत्रांचा अभ्यास करायचे. ‘साधकांना योग्य ठिकाणी कुठे जागा मिळू शकते ? कसे प्रयत्न करूया ?’, यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायलाही आरंभ केला होता.

सौ. मनीषा पाठक

४. तळमळीने आणि झोकून देऊन सेवा करणे

काका गेल्या १९ वर्षांपासून साधनेत आहेत. ७ – ८ वर्षांपूर्वी ते पुणे जिल्ह्यात सेवेसाठी आले. पद्मनकाका आणि काकू दोघांचाही सेवेप्रती उत्कट भाव आणि तळमळ आहे. पुष्कळ कौटुंबिक अडचणी असूनही काकांनी नेहमी झोकून देऊन आणि तळमळीने सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्वतःला आध्यात्मिक त्रास होता. त्या त्रासांशी लढत ते सेवा करण्याचा प्रयत्न करायचे.

५. रुग्णाईत असतांना केलेली साधना

५ अ. पुष्कळ मनापासून नामजप आणि गुरुस्मरण करणे : पद्मनकाका कोरोनामुळे रुग्णालयात भरती असतांना त्यांना भ्रमणभाषवरून बोलायला अडचण यायची, तरीही काकांचे कुटुंबीय आणि काका तेथील परिचारिकेच्या भ्रमणभाषवर ‘कॉन्फरन्स’मध्ये जोडून बोलायचे. शेवटच्या क्षणापर्यंत ते त्यांना सांगितलेला नामजप पुष्कळ मनापासून करायचे. रुग्णालयात अतीदक्षता विभागामध्ये असतांनाही ते नेहमी ‘ताई, माझे प्रयत्न होत आहेत ना ? मी मनापासून नामजप करत आहे. गुरुमाऊलींचे स्मरण होत आहे’, असे पुष्कळ भावपूर्ण सांगायचे. त्यांच्याशी बोलतांना ‘त्यांचे मन आधीच्या तुलनेत पुष्कळ स्थिर झाले आहे’, असे मला जाणवायचे.

५ आ. सत्संगातील सूत्रे ऐकून आनंद होणे : रुग्णालयात असतांना काकांना बोलतांना कधी त्रास व्हायचा. तेव्हा ते केवळ ‘सत्संगातील काही सूत्र सांगा’, एवढे बोलायचे. ती सूत्रे सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आनंद व्हायचा.

५ इ. शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक असणे : काकांचे देहावसान होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत ते सकारात्मक होते. ‘मला गुरुस्मरण आणि साधनेचे प्रयत्न करायचे आहेत’, असे ते मला म्हणाले होते.

६. कृतज्ञता

पद्मनकाका, काकू (श्रीमती भारती पद्मन), त्यांचा मुलगा श्री. सौरभ पद्मनदादा आणि सून सौ. दीपाली पद्मन या सर्वांचेच या कठीण काळातील साधनेचे प्रयत्न, गुरुदेवांवरील श्रद्धा अन् भाव हे सर्वच मला पुष्कळ जवळून अनुभवता आले. ‘प्रत्येक स्थितीमध्ये सकारात्मक राहून साधनेचे अखंड प्रयत्न कसे करायचे ? गुरुभक्ती कशी असावी ? गुरुमाऊलींवर श्रद्धा कशी असावी ?’, हे मला पद्मनकाकांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून शिकता आले.

‘हे गुरुदेवा, असे उत्कट भावभक्ती असणारे साधक तुम्ही आम्हाला दिले’, त्यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मनीषा महेश पाठक, पुणे

पद्मनकाकांच्या देहावसानानंतर केवळ काहीच दिवसांत सत्संगात आणि सेवेत सहभागी होणार्‍या श्रीमती पद्मनकाकू अन् कुटुंबीय !

‘पद्मनकाकांच्या निधनानंतर काही दिवसांत पद्मनकाकू पुणे जिल्ह्यातील सर्व साधकांसाठी असणार्‍या सत्संगात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सत्संगात ‘या कठीण काळात गुरुकृपा कशी अनुभवली ?’, हे सांगितले. त्यानंतर त्यांनी ‘ऑनलाईन’ सेवांनाही आरंभ केला. त्यांचा मुलगा आणि सून यांनीही सत्संगाला सहभागी होण्यास आरंभ केला.’

– गुरुचरणी,

सौ. मनीषा पाठक, पुणे

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक