हुतात्मा मेजर विभूती धौंडियाल यांच्या पत्नी निकिता कौल यांचा सैन्यात प्रवेश
नवी देहली – वर्ष २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले मेजर विभूती धौंडियाल यांच्या वीरपत्नी निकिता कौल यांनी सैन्यात प्रवेश केला. त्या लेफ्टनंट म्हणून सैन्यात कार्यरत असतील. हुतात्मा होण्याच्या केवळ ९ मास आधी मेजर धौंडियाल यांचा विवाह निकिता कौल यांच्याशी झाला होता. त्या वेळी निकिता कौल या बहुराष्ट्रीय आस्थापनात काम करत होत्या. मेजर धौंडियाल हुतात्मा झाल्यानंतर पतीच्या निधनाचे दुःख न करत बसता त्यांनी सैन्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
सैन्यात भरती होण्यासाठी त्यांनी ओटीए, चेन्नई येथे कठोर प्रशिक्षण घेतले. ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘पासिंग आऊट सेरेमनी’मध्ये लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी निकिता कौल यांच्या गणवेशावर ‘स्टार’ लावून त्यांचे अभिनंदन केले. ‘मेजर धौंडीयाल यांचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला’, असे निकिता कौल यांनी सांगितले.