सरकाने कोरोनाने मृत्यू झालेल्यांची माहिती लपवल्याने भाजप ‘कोविड’ मृत्यूचे विशेष ‘ऑडिट’ करणार
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची माहिती
सोलापूर – राज्य सरकारने महाराष्ट्रातील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती लपवली आहे. त्यामुळे भाजप येत्या काळात महाराष्ट्रातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे विशेष ‘ऑडिट’ करणार असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. ते दिनांक २९ मे या दिवशी सोलापूर दौर्यासाठी आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी किरीट सोमय्या यांनी प्रारंभी शासकीय रुग्णालय आणि मार्कंडेय रुग्णालय येथे भेट दिली, तसेच त्यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख हेही उपस्थित होते.
या वेळी किरीट सोमय्या म्हणाले की,
१. लस निर्माण करणार्या आस्थापनांचे उत्पादन एका वर्षात १० कोटी होत असल्यास देशातील सर्व लोकांना लस मिळण्यासाठी १२ मास लागणार आहेत. एप्रिल मासामध्ये झालेले मृत्यूकांड आणि कोरोना लस यांचा काय संबंध ?
२. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत भारतात अडीचशे कोटी लसी येणार आहेत. त्यातील सव्वा दोनशे कोटी लस भारतात बनवल्या जाणार आहेत, तर २५ कोटी लसी आयात केल्या जाणार आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत प्रत्येक भारतियाचे लसीकरण झालेले असेल.
वाझे आणि देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब आणि जितेंद्र आव्हाड यांचा क्रमांक ! – किरीट सोमय्या
सचिन वाझे यांच्यासमवेत पाच अधिकारी निलंबित झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली आहे, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह घरी गेले आहेत. आता पुढे गृहमंत्री अनिल परब यांचा क्रमांक लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा क्रमांक लागणार आहे, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.