संभाजीनगर जिल्ह्याच्या ‘आपत्ती व्यवस्थापन कक्षा’त पुष्कळ त्रुटी !
२ मासांपूर्वीच सर्व सिद्धता होणे अपेक्षित होते. आता पावसाळ्याच्या तोंडावर प्रयत्न केल्यास सिद्धतेला विलंब होऊन याचा फटका नागरिकांना बसू शकतो, याचा विचार प्रशासनाने केला नाही का ?
संभाजीनगर – नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या ‘आपत्ती व्यवस्थापन कक्षा’त साधनसामग्री आणि मनुष्यबळ यांचा अभाव आहे. त्यामुळे जिल्ह्याला अतीवृष्टी, पूर, वादळाचा तडाखा बसल्यास हा विभाग त्याचे योग्य व्यवस्थापन करू शकणार का ? याविषयी शंका आहे.
या स्थितीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे साहाय्यक अधिकारी अजय चौधरी यांनी ‘सध्या साधनसामग्रीचे प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन भरवले आहे. जिल्हा शोध आणि बचाव पथकेही कार्यान्वित केली आहेत. टप्प्याटप्प्याने जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर समित्यांच्या बैठका, प्रशिक्षण यांवर भर देत आहोत’, असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच महापालिकेचे अग्नीशमन अधिकारी एस्.के. सुरे यांनी ‘साधनसामग्री, मनुष्यबळ अल्प पडले, तर राज्य अथवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला पाचारण केले जाते. तरीही संकट आटोक्यात येत नसेल, तर लष्कराचे साहाय्य घेतले जाते’, असे म्हटले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षातील त्रुटी –
१. आपत्ती व्यवस्थापन कक्ष भंगार आणि नादुरुस्त साधनसामग्रीवर अवलंबून आहे. येथे पुरेसे मनुष्यबळ नसून आगीची घटना घडल्यास या विभागाला महापालिकेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून रहावे लागत आहे.
२. गेल्या २ वर्षांपासून कोविडमुळे विभागाकडे पुरेसा निधी नाही.
३. जिल्ह्यातील ९ तालुक्यांत १ सहस्र ३४१ गावे आहेत. शहरी आणि ग्रामीण मिळून ५० लाखांवर लोकसंख्या आहे. जिल्ह्यात ८६१ ग्रामपंचायती आहेत; मात्र पावसाळा तोंडावर असतांना गावांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्याप सिद्ध नाहीत.