गंभीर संसर्ग असणार्‍या कोरोना रुग्णांवर उपचारास नकार दिल्यास कठोर कारवाई ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

आढावा बैठकीत बोलतांना पालकमंत्री जयंत पाटील

सांगली – कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णास रुग्णालयात बेड शिल्लक असतांनाही भरती करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून येत आहेत. अशा प्रकारे कोरोना रुग्णाला उपचार नाकारणार्‍या अथवा टाळाटाळ करणार्‍या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या संदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही चेतावणी दिली.

पालकमंत्री म्हणाले

१. जिल्ह्यात जवळपास ६ सहस्र ५०० ते ७ सहस्र कोरोना ‘स्वॅब’ पडताळणी करण्यात येत आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने अल्प होत असून ते सध्या १७.३५ टक्क्यांवर आले आहे. गृहविलगीकरणात सध्या अनुमाने ८ सहस्र ५००, तर संस्थानिक विलगीकरणात १ सहस्र ६५० रुग्ण आहेत.

२. दळणवळण बंदी केल्याने बाधितांची संख्या घटत आहे.

३. तिसर्‍या लाटेसाठी यंत्रणा आतापासूनच सुसज्ज ठेवा. या लाटेचा लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेता उपचारासाठी लागणारी औषधे वेळेत खरेदी करून ठेवा. या संदर्भात निर्माण करण्यात आलेल्या बालरोग तज्ञांच्या ‘टास्क फोर्स’च्या सूचनांनुसार सर्व कार्यवाही करा.

४. फळ, भाजीपाला व्यापार्‍यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल; पण कोरोना संसर्गाची ही वेळ अशी आहे की, सर्वांनीच यामध्ये संयमाने सहकार्य करणे आवश्यक आहे.