पीकविमा वाटपात महाविकास आघाडीने पक्षपात केला ! – भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा आरोप
गंगापूर (जिल्हा संभाजीनगर) – ‘तालुक्यात गेल्या वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या हातचे पीकही वाया गेले होते; मात्र हानीभरपाईच्या साहाय्यापासून तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे वंचित राहिला आहे. पीकविमा वाटपात महाविकास आघाडीने पक्षपात केला आहे’, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
शेतकर्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल !
अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होऊनही पीक विमा आस्थापनांनी तालुक्यातील शेतकर्यांना खरीप पीक विम्याच्या रकमेपासून वंचित ठेवले आहे. गंगापूर मतदारसंघात पीकविमा देण्यात आला नाही; मात्र शिवसेनेच्या मतदारसंघात पीकविमा वाटप केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पीकविमा नाही दिला, तर शेतकर्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी आमदार बंब यांनी दिली आहे.