‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याची मोठी हानी
१४ दिवसांनंतरही वीजपुरवठा नाही : किल्ल्यातील घरे, मंदिरे यांची हानी
मालवण – ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसला, तसाच तो येथील सिंधुदुर्ग किल्ल्यालाही बसला. चक्रीवादळामुळे किल्ल्यातील घरांची मोठी हानी झाली आहे, तसेच वीजवाहिन्यांचे खांब, झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा १४ दिवसांपासून बंद आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराच्या मागील भागावर वडाचे झाड पडून हानी झाली आहे, तसेच किल्ल्यातील श्री भवानीमाता मंदिर आणि श्री महापुरुष मंदिर यांचे छप्पर उडून गेले आहे. एवढी हानी होऊनही शासनाकडून कोणतीच नोंद न घेतली गेल्याने किल्लावासियांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला विशेषतः मालवण आणि देवगड तालुक्यांना मोठा तडाखा दिला. या तडाख्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. चक्रीवादळामुळे हानीग्रस्त होऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील नरेश सावंत, श्रीकृष्ण फाटक आणि मधुसूदन फाटक यांच्या घरांची कौले उडून गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या शिवराजेश्वर मंदिराच्या काही भागावर झाड पडल्याने हानी झाली आहे. चक्रीवादळामुळे किल्ल्यातील रहिवाशांच्या ३ होड्याही समुद्रात वाहून गेल्या आहेत.
वर्ष १९७८ पर्यंत सिंधुदुर्ग किल्ल्यावर वीज नव्हती. वर्ष १९७९ मध्ये किल्ल्यावर वीजपुरवठा करण्यासाठी विजेचे खांब उभे करण्यात आले आणि वर्ष १९८१ मध्ये किल्ल्यावर वीजपुरवठा चालू झाला. त्यानंतर अनेकदा वादळी वार्यांमुळे वीजपुरवठा खंडित व्हायचा; परंतु काही दिवसांतच तो सुरळीत केला जात असे; मात्र आता तौक्ते चक्रीवादळानंतर अद्यापही येथे वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. किल्ल्यामधील विहिरीचे पाणी गढुळ बनले आहे.
पावसाळ्याचे ४ मास सिंधुदुर्ग किल्ल्यावरील लोकांचा मालवण शहराशी असणारा संपर्क तुटतो. पावसाळ्यात हे रहिवासी किल्ल्यातच रहातात. त्यांना शासनाकडून धान्य पुरवले जाते; यावर्षी मात्र पावसाळा जवळ येऊनही या धान्याविषयी शासनाने कोणतीच तरतूद केलेली नाही, असे सांगण्यात येते.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीजपुरवठा लवकरच चालू होणार
तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील खंडित झालेला वीजपुरवठा १४ दिवसानंतरही सुरळीत झालेला नाही. याविषयी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी महावितरण आस्थापनाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. या वेळी अधिकार्यांनी किल्ल्यावरील वीजपुरवठा चालू करण्याचे काम हाती घेतल्याचे सांगितले. २९ मे या दिवशी सायंकाळपर्यंत किल्ल्यावरील वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मिळाली नव्हती.
देवबाग गावात १४ दिवसांनंतर वीजपुरवठा
तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण तालुक्यातील देवबाग गावात प्रचंड हानी झाली आहे. यामध्ये वीज वितरण आस्थापनेचीही मोठी हानी झाली आहे. विजेचे खांब आणि विद्युत्वाहिन्या तुटल्यामुळे १६ मेपासून देवबागमधील वीजपुरवठा बंद होता. तो २८ मे या दिवशी चालू करण्यात आला.