गोव्यातील संचारबंदीत ७ जूनपर्यंत वाढ
पणजी, २९ मे (वार्ता.) – राज्यशासनाने गोव्यात राज्यस्तरीय संचारबंदी ७ जून या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली. यासंबंधी संबंधित जिल्हाधिकार्यांनी अधिकृत घोषणा केली आहे.
राज्यात प्रारंभी ९ ते २४ मे या कालावधीत आणि नंतर ती वाढवून ३१ मेपर्यंत राज्यस्तरीय संचारबंदी लागू करण्यात आली होती. राज्यात चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण आणखी घटवण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी म्हटले आहे. सध्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालू आहेत, तर औषधालये आणि आरोग्य सेवेसंबंधी सर्व सुविधा यांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे.
पणजी मार्केटमधील व्यावसायिकांना दुकाने चालू करण्याची अनुमती द्या ! – उदय मडकईकर, माजी महापौर, पणजी महानगरपालिका
राज्यशासनाने संचारबंदीमध्ये ७ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून शासनाने पणजी मार्केटमधील व्यावसायिकांना काही प्रमाणात सवलत द्यावी. कोरोना महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून दुकाने चालू करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी पणजी महानगरपालिकेचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली आहे.
नगरसेवक उदय मडकईकर पुढे म्हणाले, ‘‘पणजी मार्केटमधील अनेक दुकानदारांनी पावसाळी साहित्य विक्रीसाठी आणले आहे. ग्राहकांनाही या वस्तूंची आवश्यकता आहे. शासनाने सर्वांचा विचार करून दुकाने चालू करण्यास अनुमती द्यावी.’’