जनहो, ‘आपत्काळात सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल’, अशी घातक मानसिकता पालटा आणि जीवनाचे सार्थक करण्यासाठी साधनेला आरंभ करा !
‘साधकांनी आपत्काळाच्या सिद्धतेविषयी समाजातील व्यक्तींना सांगितल्यास सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल, असे ते सांगतात. साधकांनी त्यांच्या नातेवाइकांना याविषयी सांगितल्यावर ‘तेही असेच उत्तर देतात’, असे लक्षात आले. तेव्हा मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. जगावर कोसळलेल्या कोरोना महामारीच्या संकटकाळी बहुतांश लोकांची झालेली दुःस्थिती !
पहिली गोष्ट म्हणजे ‘सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल. पुढचे पुढे बघू’, असे सांगणे, हाच एक मोठा भ्रम आहे. आताची परिस्थिती पाहिली, तरी ‘हा भ्रम कसा आहे ?’, हे लक्षात येते. मागील ७ – ८ मासांपासून कोरोना महामारीने लोकांना भयभीत केले आहे. त्याचा विचार केला पाहिजे.
अ. ‘कोरोना आपल्यालाही होईल’, या विचारानेच लक्षावधी लोकांना निराशा आली आहे.
आ. अनेक जण १ – २ मासांच्या दळणवळण बंदीत कुटुंबियांपासून दूर राहिल्यामुळे काहीतरी मार्ग काढून घरी जाण्याचा खटाटोप करत होते.
इ. काही लोकांना सर्दी, ताप किंवा खोकला यांपैकी एखादे जरी लक्षण जरी दिसले, तरी ‘मला कोरोनाचा संसर्ग झालेलाच आहे’, अशा भीतीपोटी काही जणांनी आत्महत्या केली.
ई. कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, तर काही जण घाबरून मृतदेह घ्यायला सिद्ध नव्हते.
उ. आपत्काळाच्या एका लहानशा झटक्याने जगाची अर्थव्यवस्था ढासळली.
२. जीवनाची काहीच श्वाश्वती नसतांनाही लहान-मोठ्या गोष्टींचे पूर्वनियोजन आणि सिद्धता करण्याची अनेकांना सवय असणे
‘सर्वांचे जे झाले, तेच माझेही होईल’, अशा तटस्थ भावनेने तुम्ही विचार करत असाल, तर तुम्ही आगामी घोर आपत्काळाला कसे तोंड देणार ? मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, अशा अनेक गोष्टींचे आपण आधीच नियोजन आणि सिद्धता करतो. ‘आपण पुढील वर्षी जिवंत रहातो कि नाही’, हे ठाऊक नसूनही आपण भ्रमणभाषवर एक वर्षाचा ‘पॅक’ (इंटरनेट सुविधेसह संपर्कासाठीचे पैसे आगाऊ) भरून घेतो.
३. ‘सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल’, असे म्हणणारे स्वतःला होणारी साधी डोकेदुखी किंवा पोटदुखीही सहन करू न शकणे
‘सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल’, असे असेल, तर आताही जगामध्येे विविध प्रकारची दुःखे असलेले लोक आहेत. मग आपण आपल्याला होणारे दुःख दूर करण्याचा प्रयत्न का करतो ? आपल्यात साधी डोकेदुखी किंवा पोटदुखी सहन करण्याचीही क्षमता नसते. असे असतांना प्रत्यक्ष मृत्यू समोर आला, तर आपली काय अवस्था होईल ? ‘तुमचा आजार शेवटच्या टप्प्याला पोचला आहे. तुमचे आता काही दिवसच राहिले आहेत’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले, तर आपल्या मनाची स्थिती कशी होईल ?
समाजातील अशा व्यक्तींचे बोलणे ऐकल्यावर त्यांच्यातील ‘स्वतःला अधिक कळते, परिस्थिती न स्वीकारणे, प्रतिमा जपणे, घराची आसक्ती, उन्नतांचे न ऐकणे’, हे स्वभावदोष लक्षात आले. सनातन संस्था स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायला शिकवते. ही प्रक्रिया राबवल्यावरच मनाला स्थिरता येते आणि साधना गुणात्मक होते.
४. ‘पुढचे पुढे बघू’, असे म्हणणार्यांना प्रत्यक्षात मृत्यूला सामोरे जाण्याचा प्रसंग स्वीकारता न येणे
आता आपण ‘पुढचे पुढे बघू’, असे म्हणत राहिलो, तर प्रत्यक्ष जेव्हा स्वतःवर प्रसंग येईल, तेव्हा वेळ गेलेली असेल. ‘पाण्याच्या प्रवाहात बुडत असतांना एका श्वासासाठी (प्राण वाचण्यासाठी) आपल्याला किती धडपडावे लागते’, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. आपल्यावर अनेक प्रकारची संकटे ओढवणार आहेत. तेव्हा आपल्याला मृत्यू येण्याची किंवा आपण विकलांग होण्याची शक्यता आपल्याला स्वीकारताच येणार नाही.
५. परिक्षित राजा आणि खट्वांग महाराज यांचा आदर्श ठेवून साधना करूया !
परिक्षित राजाला ‘एका आठवड्यात मृत्यू येणार’, असे कळल्यावर त्याने साधना करून जीवनाचे सार्थक करून घेतले. खट्वांग महाराजांना ‘एक घटिका आयुष्य आहे’, असे समजल्यावर सगळे सोडून ते ध्यानस्थ झाले आणि जीवनाचे सार्थक करून घेतले. ‘त्यांच्याप्रमाणे मला करायचे आहे’, असेे किती जणांच्या मनात येते ?
६. ‘आपत्काळात तरून जाण्यासाठी देवाची भक्ती करणे’, हाच एकमेव उपाय असून सर्वांनी साधना करणे अत्यावश्यक !
हिंदूंनो, महान ऋषिमुनी आणि संत जे सांगत आहेत, त्याच्यावर श्रद्धा ठेवून आतापासूनच आपत्काळात तरून जाण्यासाठी प्रयत्न करूया. तुम्हाला सनातन संस्थेच्या ग्रंथांमधून आध्यात्मिक स्तरावरील मार्गदर्शन मिळेल. आपण देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा अधिकाधिक प्रयत्न करूया. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (अध्याय ९, श्लोक ३१), म्हणजे ‘माझ्या भक्तांचा कधीच नाश होत नाही.’
– श्री. गणेश कामत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१०.२०२०)