‘भरतनाट्यम्’च्या संशोधनपर प्रयोगात हा नृत्यप्रकार शिकवणार्या ‘भरतनाट्यम् विशारद’ होमिओेपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना प्रयोगापूर्वी, प्रयोगाच्या वेळी आणि प्रयोगानंतर आलेल्या अनुभूती
संगीत सदर ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
या लेखाचा पहिला भाग १६ मे २०२१ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे. या पुढील भाग प्रसिद्ध करत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/477413.html |
६. प्रयोगापूर्वी – ‘प्रयोग घ्यायचा आहे’, हे कळल्यापासून मन आनंदी होऊन चार दिवस सेवेचेच विचार मनात येणे
‘भरतनाट्यम्च्या प्रयोगाचे नियोजन, समन्वय आणि पूर्वसिद्धता, असे सर्वकाही करतांना माझे मन शांत होते. इतर वेळी माझी चिडचिड होऊन मला त्रास होतो; परंतु या वेळी माझे मन आनंदी होते. ४ दिवस माझ्या मनात केवळ प्रयोगाचेच विचार होते. अशी स्थिती मी प्रथमच अनुभवली.
७. प्रयोगाच्या वेळी
चित्रीकरणाच्या संदर्भात साधक सांगत असलेले पालट माझ्याकडून सहज स्वीकारले जात होते. चित्रीकरणाच्या दृष्टीने काही प्रकार पुन्हा करावे लागले, तरी मला आनंदच मिळत होता.
७ अ. नृत्य शिकवतांना स्वतःचे अस्तित्व न जाणवणे : नृत्य शिकवतांना मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘माझ्या जागी प्रकाशरूपात देवीच आहे आणि मी त्रयस्थपणे तिला पहात आहे’, असे मला जाणवत होते.
७ आ. नृत्यशिक्षण संपल्यानंतर १७ वर्षांनी इतरांना नृत्य शिकवत असूनही ते आत्मविश्वासाने शिकवले जाणे : नृत्याचे शिक्षण संपल्यानंतर मी १७ वर्षांनी प्रथमच, तेही प्रयोगाच्या वेळी इतरांना नृत्य शिकवले. पहिल्यांदाच शिकवत असूनही मला भीती वाटली नाही. प्रयोग घ्यायचे अकस्मात् ठरल्याने पुरेशी सिद्धता न करताही माझ्याकडून सर्वकाही आत्मविश्वासाने अशा प्रकारे शिकवले गेले की, मी सतत इतरांना प्रशिक्षणच देत आहे. प्रयोगाच्या मध्ये दोन क्षण, तसेच नंतरही मला जाणवले की, प्रत्यक्ष भगवंतच तेथे असल्याने अल्प कालावधीतही हा प्रयोग निर्विघ्नपणे आणि आनंदाने पूर्ण झाला. त्यासाठी भगवंताच्या चरणी कृतज्ञता !
७ इ. ‘पंजाबी पोशाखाच्या तुलनेत साडीमध्ये नृत्य करतांना दैवी ऊर्जा अधिक प्रमाणात आकृष्ट होत आहे’, असे जाणवणे आणि ‘देवळात देवापुढे नृत्य करत आहे’, असा भाव आपोआप निर्माण होणे : इतर वेळी वर्गात मी पंजाबी पोशाख घालून नृत्य शिकत असे. ‘आज गुडघ्यापर्यंत साडी परिधान करून नृत्य शिकवणे आणि ते स्वतः करून दाखवणे’, असे करत असतांना मला स्वतःचे अस्तित्वच जाणवत नव्हते. ‘माझ्या जागी देवीच आहे’, असे मला अनुभवायला येत होते. एरव्हीच्या तुलनेत साडीमध्ये नृत्य करतांना ‘दैवी ऊर्जा माझ्याकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होत आहे’, असे मला जाणवत होते, तसेच ‘मी एखाद्या मंगल प्रसंगी देवळात देवापुढेच नृत्य करत आहे’, असा भाव माझ्यात आपोआप निर्माण होत होता. यासाठी मला प्रयत्न करावे लागले नाहीत.
७ ई. पायातील घुंगरांच्या नादाकडे लक्ष न जाता ‘घुंगरांचा नाद दैवी आहे’, असे जाणवून आपोआपच नृत्य तालबद्ध होणे : प्रयोगाच्या वेळी पायात घुंगरू घातले होते; परंतु त्यांचे अस्तित्व आणि वजन मला जाणवत नव्हते. ‘तो नाद दैवी आहे’, असे मला जाणवत होते. इतर वेळी ‘घुंगरांच्या नादामुळे पदन्यास तालात आहे का ? हे कळते; परंतु आज मात्र घुंगरांच्या नादाकडेही माझे लक्ष गेले नाही. सर्वकाही तालात आणि योग्य प्रकारे आपोआपच होत होते. ‘मी एका वेगळ्याच विश्वात आहे’, असे मला जाणवत होते.
७ उ. प्रत्येक अडवू हळूवार अशा संथ लयीत करतांना सर्वत्र स्तब्धता जाणवणे आणि ‘विलंबित लयीत देवतेचे अस्तित्व अनुभवायला येते’, हे प्रथमच अनुभवणे : प्रत्येक अडवू (पदन्यास (पायांच्या हालचाली), हातांच्या हालचाली आणि नृत्यहस्त (हाताने केल्या जाणार्या विविध मुद्रा) एकत्रितपणे करणे, याला ‘अडवू’ असे म्हणतात.) हळूवार अशा विलंबित (संथ) लयीत करतांना काही वेळा अंक मोजून, तर काही वेळा त्यासाठी असलेले विशेष शब्द आणि बोल उच्चारून आम्ही करत होतो. यामध्ये एक अंक झाल्यावर दुसरा अंक मोजण्याचा, तसेच दोन शब्दांच्या मधला कालावधी काही सेकंदांचाच होता, तरी ‘तो पुष्कळ अधिक आहे’, असे जाणवत होते. ‘त्या क्षणात सर्वकाही स्तब्ध झाले आहे’, असे जाणवत होते. एका निवांत पोकळीप्रमाणे जाणवत होते. ‘काही वेळा त्या क्षणांत मन कुठेतरी आत आत जात आहे’, असे जाणवत होते. ही अनुभूती अडवू विलंबित लयीत करतांना आली. तेव्हा विलंबित लयीत ‘देवतेचे अस्तित्व अनुभवायला येते’, हे प्रथमच अनुभवले.
८. प्रयोगानंतर
८ अ. ‘प्रयोगाच्या संदर्भात लिखाण करत असतांना स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहे’, असे जाणवणे : ‘प्रयोग घ्यायचा आहे’, असे दोन दिवस अगोदर मला कळले. तेव्हापासून प्रयोग पूर्ण संपेपर्यंत, तसेच संपल्यानंतरही एक दिवस, असे एकूण चार दिवस मला नामजप इत्यादी करण्यास वेळ मिळाला नाही, तरी मला आध्यात्मिक लाभ होऊन मला हलके वाटत होते. प्रयोगाच्या संदर्भातील लेखाचे लिखाण करत असतांनाही ‘मला आध्यात्मिक लाभ होत आहे’, असे मला जाणवत होते. संगणकावर टंकलेखन करतांना माझे शरीर गरम झाले होते.
८ आ. ‘प्रयोगानंतर माझा तोंडवळा पुष्कळ उजळला आहे’, असे जाणवले.
८ इ. नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे उणावून, सकारात्मक ऊर्जेतही वाढ होणे आणि या कालावधीत जाणवलेले भगवंताचे अस्तित्व दिव्यच असणे : प्रत्यक्ष भरतनाट्यम् शिकतांना मला या प्रकारांचे महत्त्व वाटले नव्हते. प्रत्येक वर्गात हे प्राथमिक प्रकार करतांना मला पुष्कळ कंटाळा यायचा. आजच्या प्रयोगात प्राथमिक भागच घेतला होता. त्याचे संशोधनपर यंत्राच्या साहाय्याने आलेले परीक्षण पाहिले. ते माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. नृत्यामुळे माझी नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे उणावून सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली होती. या कालावधीत मला जाणवलेले भगवंताचे अस्तित्व ही माझ्यासाठी दिव्य अनुभूतीच होते. हे सर्व पाहून ‘भरतनाट्यम् हे शास्त्रीय नृत्य लहानपणी पालकांच्या माध्यमातून शिकवून भगवंताने माझ्यावर किती कृपा केली’, याविषयी मला कृतज्ञता वाटली. या नृत्यशैलीकडे पहाण्याचा आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्यावर अनंत कृपा केली आहे, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
– होमिओेपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, ‘भरतनाट्यम् विशारद’, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (१०.५.२०२१)
अन्य सामाईक अनुभूती
अ. नृत्य शिकवणार्या कु. आरती तिवारी यांच्या जागी भवानीमाता दिसणे : ‘आम्हाला नृत्य शिकवणार्या साधिका कु. आरती तिवारी यांच्याकडे पाहिल्यावर ‘भवानीमाताच आम्हाला शिकवत आहे आणि तिचे तत्त्व कार्यरत आहे’, असे वाटले. त्यांच्या जागी एक क्षण भवानीमाता दिसली.’ – कु. शर्वरी कानस्कर
आ. कु. आरती तिवारी एका देवीप्रमाणे दिसणे : ‘कु. आरती तिवारी यांच्याकडे पाहिले, तेव्हा त्या नेहमीपेक्षा पुष्कळ वेगळ्या दिसत होत्या. ‘त्या अधिक मोठ्या झाल्या आहेत’, असे वाटले. त्या एका देवीप्रमाणे दिसत होत्या.’ – कु. अॅलीस स्वेरदा
इ. चित्रीकरण कक्षातील प्रकाश पुष्कळ वाढल्याचे जाणवणे : ‘प्रयोगाला आरंभ झाल्यावर जसजसे प्रयोगाचे एक एक भाग पूर्ण होत होते, तसतसे चित्रीकरण कक्षातील प्रकाशाचे प्रमाण पहिल्यापेक्षा पुष्कळ वाढले आहे’, असे जाणवत होते.’ – कु. म्रिणालिनी देवघरे, होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी आणि कु. अॅलीस स्वेरदा
ई. इतर वेळी अडवू करतांना कंटाळा येणे आणि प्रयोगात हा प्रकार करतांना आनंददायी वाटून आपोआप देवाचे स्मरण होणे : ‘अडवू करायला लागल्यावर मनाला उत्साह वाटत होता. इतर वेळी आम्ही अडवू करतो, तेव्हा ते करायला नकोसे वाटतात आणि कंटाळा येतो. त्यामध्ये काही भाव नसतो, केवळ पद्न्यास आणि हातांच्या हालचाली करणे, एवढेच असते. त्यात यांत्रिकपणाही असतो; पण या प्रयोगात ‘अडवू’ हा प्रकार करतांना आम्हाला आनंद वाटत होता. आपोआप देवाचे स्मरण होत होते.’ – कु. म्रिणालिनी देवघरे, कु. प्रिशा सबरवाल, होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी आणि कु. अपाला औंधकर
‘यू.ए.एस.’ या उपकरणाद्वारे ‘भरतनाट्यम्’, तसेच ‘सालसा’ अन् ‘झुंबा’ या पाश्चात्त्य नृत्यप्रकारांच्या परिणामांविषयी केलेले वैज्ञानिक संशोधन !
‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळखवाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१. ‘भरतनाट्यम्’मुळे होणारे सकारात्मक परिणाम
‘भरतनाट्यम् हा नृत्यप्रकार करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ‘यू.ए.एस.’ या उपकरणाद्वारे प्रयोगात सहभागी झालेल्या सर्व साधकांची सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावळ मोजण्यात आली.
अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांची प्रयोगापूर्वी असलेली नकारात्मक प्रभावळ प्रयोगानंतर नष्ट होऊन सकारात्मक प्रभावळ वाढली होती.
आ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांच्या सकारात्मक प्रभावळीत वाढ झाली होती.
‘भारतीय कलांमध्ये मुळातच सात्त्विकता आहे’, हे उपकरणाद्वारेही सिद्ध झाले.
२. ‘सालसा’ आणि ‘झुंबा’ या पाश्चात्त्य नृत्यांमुळे नकारात्मक प्रभावळ वाढणे
‘विदेशी नृत्यप्रकार ‘सालसा’, तसेच विदेशी नृत्यसदृश व्यायामप्रकार ‘झुंबा’ यांचा शिकणार्यांवर आणि हे प्रकार शिकवणार्यावर काय परिणाम होतो ?’, हेही ‘यू.ए.एस.’ या उपकरणाद्वारे अभ्यासण्यात आले. त्या वेळी या दोन्ही नृत्यप्रकारांत सहभागी असलेल्या साधकांच्या नकारात्मक प्रभावळीत कमालीची वाढ होऊन सकारात्मक प्रभावळ नष्ट झाल्याचा निष्कर्ष मिळाला.’
– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (१०.५.२०२१)
|