…तर सरकारनेच अॅलोपॅथीची मान्यता रहित करावी ! – डॉ. जयलाल, अध्यक्ष, आय.एम्.ए.
योगऋषी रामदेव बाबा यांच्या २५ प्रश्नांवर डॉ. जयलाल यांनी उत्तर देणे टाळले !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – देशात उपचार पद्धतीचे स्वत:चे पूर्ण तंत्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, डीसीजीआय या यंत्रणा आहेत. रामदेवबाबा यांना अॅलोपॅथीविषयी अडचण असेल, तर ते आरोग्य मंत्रालयाशी बोलू शकतात किंवा पंतप्रधानांना अर्ज करू शकतात. सरकार अॅलोपॅथी उपचारास आय.एम्.ए.च्या दबावाखाली मान्यता देत नाही, हे लक्षात घ्या. आरोग्य मंत्रालयाला वाटत असेल की, रामदेव बाबा यांचे आरोप योग्य आहेत, तर त्याने अॅलोपॅथीची मान्यता रहित करावी आणि डॉक्टरांना उपचार करण्यापासून रोखावे. जर सरकारला अॅलोपॅथीची बाजू योग्य वाटते, तर रामदेवबाबा यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदवावा, असे वक्तव्य इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांनी केले. त्यांनी योगऋषी रामदेवबाबा यांनी अॅलोपॅथीविषयी विचारलेल्या २५ प्रश्नांना उत्तर देण्याचे मात्र टाळले. तसेच ‘रामदेवबाबा यांच्या दबावासमोर झुकणार नाही’, असे सांगत ‘आयुर्वेदीय डॉक्टरांशीही वादविवाद करण्यास सिद्ध आहे’, असेही म्हटले आहे. दैनिक भास्करने घेतलेल्या मुलाखतीत डॉ. जयलाल यांनी हे वक्तव्य केले.
After trying to bully Baba Ramdev, IMA says they will withdraw complaint and defamation suit if he retracts his remarks entirelyhttps://t.co/V0pDEh3Pvw
— OpIndia.com (@OpIndia_com) May 29, 2021
डॉ. जयलाल यांनी मुलाखतीत मांडलेली सूत्रे
१. कोविड उपचारात आयुर्वेद वा अन्य पद्धती समाविष्ट कराव्यात, ही मागणी मी कशी करू शकतो ? हा सरकारचा विशेषाधिकार आहे. कोविड उपचार प्रोटोकॉल संशोधन आणि आढाव्यानंतर पालटला आहे. मी आयुर्वेद किंवा अन्य पद्धती यांवर भाष्य करू इच्छित नाही.
२. कोविडच्या उपचारांत वापरलेल्या अनेक औषधांचे गंभीर साईड इफेक्ट्स दिसले आहेत. यावर डॉ. जयलाल म्हणाले की, साईड इफेक्ट्स तर पतंजलि उत्पादनांचेही आहेत, हे अनेक अभ्यासांत आणि चाचण्यांत समोर आले आहे. अॅलोपॅथीच्या औषधांचेही साईड इफेक्ट्स आहेत. कुठल्याही वैद्यकीय पद्धतीत साईड इफेक्ट्स तर असतातच. वैद्यकीय यंत्रणा ते न्यून करण्यासाठी सतत संशोधन आणि चाचण्या करत असते. ‘स्टिरॉईडच्या वापराने ब्लॅक फंगस झाला आहे’, असे कुणी म्हटले?
३. रामदेव बाबा यांच्या २५ प्रश्नांच्या पत्राला ज्याला वैज्ञानिक आधारच नाही, अशा दुर्भाग्यपूर्ण पत्राचे उत्तर आम्ही का द्यावे ? या प्रश्नांचे उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच द्यायला हवे. आधुनिक वैद्यकीय प्रणाली हे सतत विकसित होणार विज्ञान आहे. संशोधन आणि चाचण्या यांद्वारे आम्ही सतत अपडेट होत आहोत.
योगऋषी रामदेवबाबा यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेला #WeSupportBabaRamdev हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर !
मुंबई – योगऋषी रामदेबाबा यांच्या अॅलोपॅथीविषयीच्या कथित विधानांवरून इंडियन मेडिकल असोसिएशनने रामदेवबाबा आणि आयुर्वेद यांच्यावर टीका केली होती. योगऋषी रामदेवबाबा यांनी त्यांच्या कथित विधानाविषयी खेद व्यक्त केला असतांनाही त्यांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. या पार्श्वभूमीवर २८ मे या दिवशी रामदेवबाबा यांच्या समर्थनार्थ ट्विटरवर #WeSupportBabaRamdev हा हॅशटॅग दुपारपासून ट्रेंड करण्यात आला होता. काही काळातच तो पहिल्या क्रमांकावर होता. यावर ४५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. या ट्रेंडमध्ये आय.एम्.आय. कशा प्रकारे हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र रचत आहे, याची माहिती देण्याचा; तसेच रामदेवबाबा राष्ट्र, धर्म आणि आयुर्वेद यांच्या संदर्भात किती भरीव कार्य करत आहेत, याची माहिती देण्यात आली. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. जयलाल यांनी क्षमा मागावी, अशी मागणीही करण्यात आली. |