सातारा जिल्ह्याला कोरोनाचा विळखा
प्रशासनाच्या सर्व उपाययोजना निष्फळ
सातारा, २९ मे (वार्ता.) – सातारा जिल्ह्याला कोरोनाने घट्ट विळखा घातला असून जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना कोरोनापुढे पूर्णत: निष्फळ ठरल्या आहेत. २९ मे या दिवशी सकाळपर्यंत २ सहस्र २५७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून गत २ दिवसांत ४ सहस्र ८०३ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. २८ मे या एकाच दिवशी ३० रुग्णांचा मृत्यू झाला असून गत २ दिवसांत मृतांची संख्या ६३ ऐवढी होती. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना अपुर्या असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल यांनी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी २८ मे या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिल्हा दौरा केला. या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाला चांगलेच फटकारले.