जीवघेणी आक्रमणे केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा पोलिसांच्या कह्यात !
पिंपरी – येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे यांना दोन जीवघेणी आक्रमणे केल्याच्या प्रकरणी निगडी पोलिसांनी रत्नागिरी येथून कह्यात घेतले. त्याचे सहकारी सतीश लांडगे, सावनकुमार सलादल्लू आणि रोहित अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तानाजी पवार यांना अटक केली होती. गोळीबार झाल्यानंतर काही घंट्यांतच पवार याने बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेसह २१ जणांविरुद्ध जीवघेणे आक्रमण केल्याप्रकरणी तक्रार दिली. तसेच गोळीबाराची घटना घडण्याच्या एक दिवस आधी सिद्धार्थ बनसोडे यांनी निगडी येथील हेडगेवार भवन येथे सहकार्यांसह जाऊन पवार कोठे आहेत ? अशी विचारणा करत तेथील कामगारांना मारहाण केली. या दोन्ही प्रकरणी सिद्धार्थ बनसोडे यांना कह्यात घेतले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे.