ज्यांना काही ‘मान’ नाही, असे लोक माझ्याविरुद्ध ‘मानहानी’चा दावा प्रविष्ट करत आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा
आय.एम्.ए.ने रामदेवबाबा यांच्याविरुद्ध प्रविष्ट केलेल्या १ सहस्र कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याचे प्रकरण
हरिद्वार – ज्यांना काही ‘मान’ नाही, असे लोक माझ्याविरुद्ध १ सहस्र कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा प्रविष्ट करत आहेत, अशा शब्दांत योगऋषी रामदेवबाबा यांनी भारतीय वैद्यकीय संस्थेने (‘आयएम्ए’ने) त्यांच्याविरुद्ध प्रविष्ट केलेल्या १ सहस्र कोटी रुपयांच्या मानहानीच्या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते २८ मे या दिवशी ‘इंटरनेट मीडिया’च्या एका ‘लाइव्ह’ कार्यक्रमात बोलत होते.
रामदेवबाबा पुढे म्हणाले,
१. सध्या देशात धार्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक आतंकवाद वेगाने पसरत आहे. यातच ‘उपचारपद्धत आतंकवाद’ नावाच्या एका नव्या आतंकवादाची भर पडली आहे. आमची लढाई त्याविरोधात आहे. अॅलोपॅथीचा उद्योग जवळपास २ लाख कोटी रुपयांचा आहे. याविरोधात आम्ही लढत आहोत. सरकार आमच्या बाजूने असो किंवा नसो, आमचा लढा चालूच राहील आणि त्यात आम्ही यशस्वीही होऊ.
२. आमची कुठल्याही ‘पॅथी’शी स्पर्धा नाही, तसेच त्यांना विरोधही नाही. आकस्मिक स्थितीत अॅलोपॅथी उपचारपद्धत आवश्यक असल्याचे आम्ही मानतो आणि त्यास मान्यताही देतो; पण याचा अर्थ असा नाही की, केवळ एवढी एकच उपचारपद्धत अस्तित्वात आहे.
३. अॅलोपॅथीकडे ‘लाइफ सेव्हिंग ड्रग्स’ आणि ‘अॅडव्हान्स सर्जरी’ आहे. तिच्याकडे या २ गोष्टी असतील, तर आमच्याकडे ९८ गोष्टी आहेत. आयुर्वेद आणि निसर्गोपचार हे ‘सर्जरी’ न करता अन् औषध न घेताही उत्तम आरोग्य देतात आणि १ सहस्रांहून अधिक व्याधींवर त्यामुळे उपचार करता येतो.
४. सध्या देशातील आणि जगातील विविध रुग्णालयांत कोरोनावरील उपचारांसाठी वापरल्या जाणार्या औषधांपैकी कुठल्याही एका औषधाची अद्यापही कोरोनावरील उपचारासाठी लागू करण्यात आलेल्या ‘प्रोटोकॉल’अंतर्गत ‘क्लिनिकल ट्रायल’ झालेली नाही. मग कोणत्या आधारावर या औषधांचा वापर रुग्णांवर केला जात आहे ?