अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे मोठा विषाणू निर्माण झाल्याने ६० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू !
‘इन्फेक्शन अँड ड्रग रेसिस्टंस’ जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनाच्या अहवालाचा दावा
नवी देहली – देशात कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ‘इन्फेक्शन अँड ड्रग रेसिस्टंस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधानामध्ये या मृत्यूंचे कारण देण्यात आले आहे. कोरोना काळात रुग्णांवर अॅँटीबायोटिक्सचा (प्रतिजैविकांचा) बेसुमार वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या शरिरात सुपरबग (मोठे विषाणू) निर्माण होत आहेत. परिणामी बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन वेगाने वाढते. देशातील ६० टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू याच कारणामुळे झाला. बॅक्टेरिया आणि फंगस यांमुळे निर्माण झालेला ‘सुपरबग’ या मृत्यूंना कारणीभूत ठरला. या सुपरबगची शिकार न झालेल्यांपैकी केवळ ११ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश जण मधुमेह आणि रक्तदाब या समस्यांचा सामना करत होते, असे या संशोधन अहवालात म्हटले आहे.
१. ‘इन्फेक्शन अँड ड्रग रेसिस्टंस’ने संशोधानात म्हटले आहे की, सूक्ष्मजिवांना (बॅक्टेरियाला) निष्प्रभ करण्यासाठी अॅँटीबायोटिक्स वापरली जातात; मात्र अॅँटीबायोटिक्सचा अधिक वापर झाल्यास सूक्ष्मजीव त्यांच्या विरोधात प्रतिरोधक क्षमता विकसित करतात. त्यामुळे रुग्णांवर अँटीबायोटिक्सचा परिणाम होत नाही.
२. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी रुग्णालयांत भरती झालेल्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन आढळून आले होते. हे इन्फेक्शन औषधांना निष्प्रभ करणारे सूक्ष्मजीव पसरवत होते. याविषयीची माहिती गोळा करण्यासाठी संशोधकांनी देशातील १० रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या १७ सहस्र ५६३ रुग्णांचा अभ्यास केला. संशोधनानुसार बॅक्टेरिया आणि फंगस यामुळे संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या २८ टक्के होती. सूक्ष्मजीवांनी अँटीबायोटिक्स निष्प्रभ केल्याने कोरोना रुग्णांना बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनची लागण झाली होती.