सोलापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांचा १५ फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारणार !
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
सोलापूर, २९ मे (वार्ता.) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्य १५ फूट उंचीचा ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. २८ मे या दिवशी नियोजन भवन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. या बैठकीस कार्याध्यक्षा कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांसह अन्य मान्यवर ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये उपस्थित होते.
प्रारंभी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्वागत केले, तर समन्वयक प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची माहिती दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती गठीत केली असून त्याची पहिलीच बैठक पार पडली. प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी ब्रांझमधील अहिल्यादेवींचे शिल्प तयार करण्यासाठी १ कोटी ९० लाख ४० सहस्र रुपये अपेक्षित व्ययाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. शिल्प उभारण्याचा व्यय विद्यापिठाकडून केला जाणार असल्याचे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी या वेळी सांगितले.