त्रुटी आढळल्याने सातार्‍यातील २ चाचणी केंद्र (प्रयोगशाळा) बंद


सातारा – जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या विशेष निवड समितीने जिल्ह्यातील सर्व खासगी आणि शासकीय ‘रॅट’ चाचणी केंद्रांना भेटी दिल्या. या वेळी चाचणी केंद्रांमध्ये काही त्रुटी अढळून आल्या. त्यामुळे २ चाचणी केंद्रे जिल्हा प्रशासनाने तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

१. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये बहुतांश खासगी आणि शासकीय आरोग्य संस्थेतील कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यांची संगणकीय माहिती वेळेत भरली गेली नाही. त्यामुळे संबंधित चाचणी केंद्रांना विशेष निवड समितीने कारणे दाखवा नोटीस ठोठावली आहे.

२. नवीन रुग्णांचे लवकर निदान होऊन त्यांना उपचार मिळावेत, यासाठी ‘रॅट’ चाचणी महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालये येथे ‘रॅट’ चाचणीची सोय उपलब्ध करून दिली आहे.

३. जिल्ह्यात एकूण ५९ खासगी प्रयोगशाळा आहेत. याठिकाणी तज्ञ आधुनिक वैद्यांच्या देखरेखीखाली ‘रॅट’ चाचणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दैनंदिन ‘ऑनलाईन’ माहिती भरण्याविषयी संबंधित प्रयोगशाळांना तोंडी आणि लेखी सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. आता सर्व चाचणी केंद्रांनी मागील काही दिवसांमध्ये सर्व चाचण्यांची नोंद ‘ऑनलाईन’ पोर्टलवर केली आहे. त्यामध्ये जुन्या आणि नवीन नोंदींचा समावेश आहे.