साधकांची गुरुनिष्ठा आणि ‘सनातन प्रभात’यांमधून मी पुष्कळ शिकलो ! – वैद्य सुविनय दामले

दैनिक सनातन प्रभातच्या ‘ऑनलाईन’ २२ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे मार्गदर्शन

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभापासून म्हणजे पहिल्या आवृत्तीपासून गेली २२ वर्षे साक्षीदार आहे. साधकांचे अथक परिश्रम, त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले सर्वस्व, त्यांची गुरूंप्रतीची निष्ठा मी बघितली आहे. त्यांचा भक्तीभाव मी बघितला आहे. त्यामुळे साधकांकडून आणि दैनिकातून मला पुष्कळ शिकता आले आणि माझ्यात काही पालट करता आले, याचा विशेष आनंद मला आहे.

१. समर्थ रामदासस्वामींच्या चतु:सूत्रीनुसार ‘सनातन प्रभात’ची वाटचाल !

सनातनच्या साधकांनी घेतलेले परिश्रम हे धर्मार्थकाममोक्षाणाम् आहेच; पण तो एक पुरुषार्थही आहे. हा पुरुषार्थ धर्माच्या स्थापनेसाठी आणि अर्थ, काम अन् मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी सांगितले आहे की,

मुख्य ते हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण ।
तिसरे ते सावधपण । सर्व विषयी ॥
चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप ॥

या चतु:सूत्रीचा वापर करून ‘सनातन प्रभात’ची वाटचाल चालू आहे. त्यानुसार ‘सनातन प्रभात’ अध्यात्मशास्त्र आणि भक्तीमार्ग यांचा प्रचार करत आहे. दुसरे समाजाच्या दृष्टीने म्हणजे समाज कुठे जात आहे. त्याला नेमके कुठे जायला पाहिजे ? त्याचे इच्छित स्थळ काय आहे ? आपल्या धर्मानुसार इच्छित स्थळ हे मोक्ष आहे. त्याच्या प्राप्तीसाठी साधना कशी करायची ? याचा मार्ग दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवत आहे; म्हणून ‘सनातन प्रभात’ ज्यांच्या हाती, धर्मसंस्थापना त्यांच्या हाती’, असे म्हटले, तर काही चुकीचे ठरणार नाही. ‘सनातन प्रभात’चा जो वाचक झाला, तो धर्मस्थापनेच्या मार्गावरचा सहप्रवासी झाला. त्याला साधक, मुमुक्षू म्हणता येईल. व्यक्ती आणि समाज यांवर राष्ट्र अन् धर्म यांचे संस्कार करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे.

२. आयुर्वेदाच्या पुनरुत्थानाचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे !

वैद्य सुविनय दामले

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साध्य करण्यासाठी हा जन्म सांगितला आहे. यासाठी आरोग्य चांगले असले पाहिजे. यासाठी आयुर्वेदाची कास धरणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर आपली मुख्य चिकित्साप्रणाली आयुर्वेद व्हायला हवी होती; मात्र दुर्दैवाने निधर्मी सरकार सत्तेत राहिल्याने आपण विदेशी चिकित्सा पद्धत स्वीकारली आणि त्या पाश्‍चात्य पद्धतीनुसार आपले आरोग्य त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला. तेथेच अधोगतीला प्रारंभ झाला. आज वर्ष २०२५ च्या उंबरठ्यावर आहोत; परंतु संपूर्ण आरोग्य आपल्याला काही मिळणार नाही. हे आपल्याला मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे. ‘सनातन प्रभात’मध्ये आयुर्वेदाविषयी अत्यंत बहुमूल्य माहिती मिळत असते. साधक, वाचक, हितचिंतक कुणीही असला, तरी तुमच्याकडे येणार्‍या ‘सनातन प्रभात’मधील आयुर्वेदाची सदरे नियमित वाचा. वाचा, कृती करा आणि प्रचार-प्रसारही करा. आयुर्वेदाचे गतवैभव अत्यंत चांगले होते; मात्र आता त्याचे पुनरुत्थान करणे आवश्यक आहे. ‘सनातन प्रभात’ आयुर्वेदाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आगामी आपत्काळाच्या दृष्टीनेही ‘सनातन प्रभात’मधून चांगली माहिती येत आहे. यामध्ये आपत्काळात आयुर्वेदाच्या दृष्टीने काय काय केले पाहिजे ? याची चांगली माहिती असते.

आताच्या कोरोनाच्या काळात अनेकांना आयुर्वेदीय उपचारांनी बरे वाटले; मात्र आयुर्वेदाला राजाश्रय नाही. अधिकृतता नाही. कोरोनाला संपवण्यासाठी अनेक वैद्य काम करत आहेत. साधकही मंत्रांद्वारे प्रयत्न करत आहेत. काही जण हवन करून प्रयत्न करत आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून आपण कोरोनाला हरवणार आहोत, हे नक्कीच. असे असले, तरी आयुर्वेदाची सरकार दफ्तरी नोंद व्हायची असेल, तर सरकारवर दबाव येणे आवश्यक आहे. राष्ट्र आणि धर्म संकटात येतात, तेव्हा सर्वसामान्य लोकांनी या गोष्टी उचलून धरल्या पाहिजेत.

आगामी आपत्काळाविषयी समाजाला सतर्क करणे

तिसर्‍या महायुद्धाविषयी सांगितले जाते. जगाला यापूर्वी याविषयी माहिती नव्हती; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या आपत्काळाविषयी यापूर्वीच सांगून ठेवले आहे. यासाठी काय सिद्धता केली पाहिजे ? हे सांगितले जाते. आज दळणवळण बंदी आली, तर लोक अस्वस्थ झाले आहेत. विवंचनेत अडकले आहेत. यापुढे ३ ते ४ वर्षे आपत्काळ असणार आहे. अशा वेळी काय करायचे ? सिद्धता कशी करायची ? याचे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’ मधून होत आहे.

‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळे अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळून अध्यात्मावरील विश्‍वास वाढला

सनातन संस्थेचे मातृमंदिर म्हणजे रामनाथी, गोवा येथील आश्रम !  तेथे मला जायची जेव्हा संधी मिळते, तेव्हा तेथील व्यवस्थापन, नियोजन बघून थक्क व्हायला होते. आपत्काळात केवळ स्वत:चे रक्षण नव्हे, तर ईश्‍वराच्या आशीर्वादाने कुटुंब, साधक, समाज यांचे रक्षण कसे करायचे ? हे तेथे पहायला मिळते. भक्ताने हाक मारली, तर ईश्‍वर नक्की येतो, याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. माझा त्यावर विश्‍वास नव्हता; पण ‘सनातन प्रभात’च्या वाचनातून ईश्‍वरभक्तीचे ज्ञान मिळाल्याने माझा आता विश्‍वास बसू लागला.

आत्मोन्नतीकडे नेणारी ‘सनातन प्रभात’मधील सर्व सदरे

‘सनातन प्रभात’मधील सर्व सदरे आत्मोन्नतीकडे नेणारी, मोक्षाकडे नेणारी आहेत. आपल्यातील स्वभावदोष काढून परिपूर्ण कसे व्हावे ? याचे मार्गदर्शन यातून होते. दैनिकात प्रसिद्ध होणार्‍या साधकांच्या अनुभूतींतून आणि मार्गदर्शनातून अध्यात्मात साधकत्वापर्यंत मार्गक्रमण कसे करायचे ? हे लक्षात येते. ज्ञानयोग, कर्मयोग कसा आचरायचा ? भक्तीमार्गाने कसे जायचे ? हे शिकवणारा मार्ग म्हणजे गुरुकृपायोग ! हा योग दैनिक ‘सनातन प्रभात’मधून शिकायला मिळतो. हे जे शिकतो, ते कृतीत आणले, तर आनंद मिळणार आहे.

अध्यात्मातील टप्प्यांनुसार साधना करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ उपयोगी

विज्ञानाला मर्यादा आहेत. जेथे विज्ञान संपते, तेथे अध्यात्म चालू होते. तसे ‘अ‍ॅलोपॅथी संपते, तेथे आयुर्वेद चालू होतो.’ चांगला साधक होण्यासाठी काय करायला पाहिजे ? याचे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’मधून मिळते. मी सामान्य जीव म्हणून जन्माला आलो होतो. त्यातून मानवत्वाकडे, मानवत्वाकडून साधकात्वाकडे, साधकत्वाकडून संतत्वाकडे, तेथून देवत्वाकडे आणि पुढे मोक्षाचा मार्ग माझ्यासाठी खुला असणार आहे. ही साधनेतील वाटचाल कशी करायची ? अध्यात्मात आपण कुठे आहोत ? आपल्याला कुठे जायचे आहे आणि काय कराचये आहे ? हे समजण्यासाठीही ‘सनातन प्रभात’ उपयोगी पडते. उच्च-नीच, धर्म-जाती, गरीब-श्रीमंत असा कोणताच भेद नसणारे एक छत म्हणजे सनातन संस्था आहे. ‘सनातन प्रभात’ मी नियमित वाचतो. माझ्यात झालेल्या पालटांना ‘सनातन प्रभात’चा पुष्कळ मोठा हातभार आहे. जसे व्यक्ती १०० वर्षे जगण्यासाठी काय करायचे ? हे आयुर्वेद सांगते, तसे सनातन प्रभात १०० वर्षे आनंदी कसे रहायचे ? ते शिकवत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या प्रत्येक सूचनेचा आदर करून आपले जीवन राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी व्यतीत केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना नक्कीच होणार आहे.’

– वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय.

सर्वांगाने ज्ञान देणारे वृत्तपत्र म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

‘सनातन प्रभात’मध्ये येणारी माहिती विषयानुसार संग्रहित केली, तर एक छंद जोपासला जाण्यासह एक चांगली माहिती संकलित होईल. केवळ आयुर्वेदच नव्हे, तर ‘सनातन प्रभात’ सर्वांगाने माहिती देणारे दैनिक आहे. आपला इतिहास, आपला भूगोल, क्रांतीकारकांचा त्याग आदी सर्वांगसुंदर माहिती सनातन प्रभातमधून येत असते. याचा आधार घेऊन मला एक माणूस म्हणून घडायचे आहे. समाजातील अत्यंत गढूळ वातावरणात मला कमळासारखे रहायचे असेल, या वातावरणाचा माझ्यावर काही परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर त्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन आणि त्यात सांगितेल्या सूत्रांचे अनुकरण करणे आवश्यक आहे.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीमुळे संस्कारांची आदानप्रदानता होत होती. आज संस्कृती काय आहे ? संस्कार काय आहेत ? इतिहास, रामायण-महाभारत यांविषयी अत्यल्प लोकांना माहिती आहे. खरा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचले पाहिजे. हे सर्व ज्ञान आपण पुढच्या पिढीपर्यंत पोचवले पाहिजे. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा आवश्यक आहे. त्याप्रमाणे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम निर्माण होणे आवश्यक आहे आणि तेही बालपणापासूनच, तरच त्याची जपणूक होणार आहे.

– वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय.

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे माझ्यात अनेक पालट झाले ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

माझ्या मनात ‘मंदिरात का गेले पाहिजे ?’, ‘पूजा का केली पाहिजे ?’, ‘देवपूजा करून काय उपयोग ?’ आदी प्रश्‍न होते. हे प्रश्‍न विज्ञानवादी दृष्टीकोनामुळे झालेल्या बुद्धीभेदामुळे माझ्या मनात निर्माण होत असत; परंतु दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार कृती केल्याने माझ्यात अनेक पालट झाले. ते पालट मलाही जाणवू लागले. मी भक्तीमार्गाकडे वाळू लागलो. नामसाधना करू लागलो. माझ्याकडे येणार्‍या रुग्णांनाही मी साधना सांगू लागलो. आज अनेक व्यक्ती साधनेतील आनंद घेत आहेत. मजा करणे हा पाश्‍चात्य संस्कृतीचा भाग झाला, तर आनंद घेणे ही भारतीय संस्कृती आहे. आनंदात रहाण्यासाठी भूतकाळ, भविष्यकाळ नव्हे, तर वर्तमानकाळात राहिले पाहिजे. वर्तनमानकाळात राहून आनंद कसा घ्यायचा, हे समजण्यासाठी ‘सनातन प्रभात’ वाचन केले पाहिजे.