गिरीश कुबेर यांच्या ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर बंदी घाला !
|
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २८ मे (वार्ता.) – ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीष कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची आणि त्यांची अपकीर्ती करणारी माहिती दिली आहे. यामुळे आमच्यासारख्या देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या धारकर्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. समाजात जातीय तेढ निर्माण होण्यासाठीच अशा पद्धतीचे लिखाण केले असावे, असा संशय यामुळे उत्पन्न होतो. तरी गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर देशव्यापी बंदी घालावी. ज्यायोगे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारित होणार नाही. असे न झाल्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुस्तकाचा तीव्र निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.या वेळी श्री. गजानन महाजनगुरुजी, सर्वश्री उत्तम सातपुते, निखिल ठाकर, शंकर शिरापुरम्, प्रदीप कांबळे आणि अन्य उपस्थित होते.
अपर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे सहनशीलता नव्हती आणि परराष्ट्रविषयक धोरणही नव्हते’, असा उल्लेख केला असून त्याला कोणत्याही प्रकारचा संदर्भ अथवा पुरावे नाहीत.
२. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सहस्रो कार्यकर्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासात व्रतस्थ राहून त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करतात. त्यांच्या पावन स्मृतीस वंदन करण्यासाठी एक मास आवडत्या गोष्टी सोडतात. गिरीश कुबेर यांच्या लिखाणामुळे देव, देश, धर्मभक्त धारकर्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.