युरेनियमची तस्करी आणि भारताची सुरक्षा !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘मुंबई येथे आतंकवादविरोधी पथकाने २१ कोटी रुपयांचे ७ किलो १०० ग्रॅम युरेनियम नुकतेच पकडले. ‘युरेनियम हे बाजारात मिळत नाही. ते नैसर्गिक युरेनियम होते’, असे डॉ. भाभा अणु संशोधन संस्थेने सांगितले आहे. अणूशक्तीपासून वीजनिर्मिती करण्यासाठी अणुभट्टीमध्ये कच्चा पदार्थ म्हणून या युरेनियमचा वापर केला जातो. नैसर्गिक युरेनियम वापरल्यानंतर जे ‘बायप्रॉडक्ट’ बाहेर पडते, त्याला ‘प्ल्युटोनियम्’ म्हणतात. एका चांगल्या अणुभट्टीमधून प्रत्येक वर्षाला जे प्ल्युटोनियम बाहेर पडते, त्यातून २ ते ३ अणुबॉम्ब निर्माण करता येतात. याचा अर्थ नैसर्गिक युरेेनियमचा वापर कुणीही सामान्य माणूस करू शकत नाही. त्याचा वापर केवळ न्यूक्लिअर रियाक्टरमध्येच केला जातो. हे युरेनियम भारतात मिळत नाही. भारतातील अणुभट्ट्या थोरियमपासून चालवल्या जातात.

नागपाडा येथे काही भंगारवाले आहेत. त्यांच्याकडे बाहेरील देशातून कचरा येतो. त्या माध्यमातून हे नैसर्गिक युरेनियम त्यांच्याकडे आले असावे. बहुतांश जे भंगार समुद्रमार्गे कंटेनरमधून येते, त्याची जवाहरलाल पोेर्ट ट्रस्ट किंवा मुंबई बंदर येथे पडताळणी केली जाते. त्यातूनही ते पुढे आले, तर नक्कीच आपली सुरक्षा व्यवस्था ही अपेक्षित स्तराला नाही, हे निश्‍चित होईल. ‘सीआयएस्एफ्’ आणि सीमा शुल्क विभाग (कस्टम) आदी लोकांना त्यांच्या कामामध्ये सुधारणा करावी लागेल.

जर हे भंगार तस्करीच्या माध्यमातून आले असेल, तर आपली सागरी सुरक्षा सबळ नाही. तिला आणखी सबळ करणे आवश्यक आहे. जरी या नैसर्गिक युरेनियमचा वापर भारताला अणुबॉम्बसाठी करता आला नाही, तरी त्यामधून बाहेर पडणार्‍या ‘क्ष’ किरणांमुळे (रेडिएशन्समुळेे) लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे युरेनियम भारतात येणे अवैध असल्यामुळे या घटनेची सखोल चौकशी केली जावी. आपल्या सुरक्षेला जेथून भगदाड पडले असेल, ते त्वरित बुजवणे आवश्यक आहे. नैसर्गिक युरेनियम कोणत्याही माध्यमातूून भारतात आले असले, तरी त्याला वेळीच रोखणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे