लेखापरीक्षणानंतर १२ कोटी ७६ लाख रुपये कमी केले !
रुग्णालयांनी अधिक देयक आकारल्याप्रकरणी पुणे महानगरपालिका प्रशासनाचे पाऊल
१. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही रुग्णालयांनी अधिक रकम आकारली. रुग्णालयांवर कठोर कारवाई न झाल्याचा हा परिणाम ? आता तरी या रुग्णालयांवर कठोर कारवाई व्हायला हवी. २. रुग्णालयांनी आकारलेले जास्तीचे पैसे संबंधितांना सव्याज परत करायला हवेत ! |
पुणे – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर रुग्णालयांनी दिलेल्या ८ सहस्र १२५ वैद्यकीय देयकांचे लेखापरीक्षण करण्यात आले असून यामध्ये जास्तीचे आकारलेले १२ कोटी ७६ लाख रुपये कमी करण्यात आले आहेत. रुग्णालयांकडून अधिक रकमेची वैद्यकीय देयके आकारल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. त्यांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली असून त्यामध्ये उपायुक्त, सनदी लेखापाल आणि डॉक्टर यांचा समावेश आहे. ही पथके दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या देयकांचे लेखापरीक्षण करत आहेत. (दीड लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या देयकांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे काय ? त्या पीडितांना न्याय कसा मिळणार ? यावरून समाजाला धर्मशिक्षण देऊन स्वार्थांधतेची वृत्ती समूळ नष्ट करणे, हीच मुळापासून उपाययोजना आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)