गोव्यात गेल्या २४ घंट्यांत चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट

दिवसभरात ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

(प्रतिनिधिक छायाचित्र)

पणजी – गोव्यात २७ मे या दिवशी ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनामृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २ सहस्र ५३८ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ५ सहस्र ९५१ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ५०४ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटून २५.२७ टक्के झाले आहे. २६ मे या दिवशी हे प्रमाण ३२.२२ टक्के होते, तर त्या आधी काही दिवस ३० टक्क्यांहून अधिक होते. दिवसभरात १ सहस्र ५५७ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १४१ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या १५ सहस्र ६९९ झाली आहे. गोव्यात सध्या मडगाव येथे सर्वाधिक १ सहस्र ४५५ रुग्ण आहेत.