दोडामार्ग येथे विवाह सोहळ्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ५० सहस्र रुपये दंड
दोडामार्ग – दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तहसीलदार अरुण खानोलकर यांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. २६ मे या दिवशी येथे चालू असलेल्या एका विवाह सोहळ्यास २५ हून अधिक लोक उपस्थित असल्याने तहसीलदार, पोलीस आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी संबंधितांना ५० सहस्र रुपये दंड आकारला.
कसई-दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रातील एका मंगल कार्यालयात एक विवाहसोहळा होता. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या पथकाने कार्यस्थळी अचानक भेट दिली. विवाह सोहळ्यास वधू-वरासह २५ जणांना उपस्थित रहाण्याची अनुमती होती; मात्र तेथे २५ हून अधिक जण उपस्थित होते. त्यामुळे ५० सहस्र रुपये दंड आकारण्यात आला.
तालुक्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे यापुढे नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसीलदार खानोलकर यांनी सांगितले.